ट्रॅक्टरखाली दबून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:48+5:302021-03-27T04:20:48+5:30

कोपरगाव : उसाच्या खळ्यात ऊस भरण्यासाठी विनानंबरचा ट्रॅक्टर चालवीत घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर उलटला. या अपघतात ट्रॅक्टरवर ...

The young man was crushed under the tractor | ट्रॅक्टरखाली दबून तरुण ठार

ट्रॅक्टरखाली दबून तरुण ठार

कोपरगाव : उसाच्या खळ्यात ऊस भरण्यासाठी विनानंबरचा ट्रॅक्टर चालवीत घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर उलटला. या अपघतात ट्रॅक्टरवर बसलेला वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील २४ वर्षीय तरुण ट्रॅक्टरखाली दबल्याने जागीच ठार झाला, तर चालकाला दुखापत झाली आहे.

ही घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ते वारी रस्त्यावर संवत्सर शिवारातील अमर ठाकरे यांच्या घरासमोर गुरुवारी (दि.२५ ) सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास घडली. कल्पेश प्रकाश भाले (वय २४), असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रवी गोकुळ बारवाल ( वय २१, रा. हाजीपूरवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगबाद ) याच्या फिर्यादीवरून चालक दीपक सखाहरी दिवेकर (रा. शिवूर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील मयत कल्पेश भाले व रवी बारवाल हे दोघे गुरुवारी श्रीरामपूर येथून कोपरगाव तालुक्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर चालक असलेला त्यांचा मित्र दीपक दिवेकर याला दुचाकीवरून भेटण्यासाठी आले होते. दुपारी ४ वाजता या तिघांची पुणतांबा फाटा येथे भेट झाली. त्यानंतर तेथून खळ्यातून ऊस आणण्यासाठी जात असलेला दीपक दिवेकर व मयत कल्पेश भाले हे दोघे ट्रॅक्टरवर बसून रस्त्याने जात होते, तर रवी बारवाल हा त्यांच्या मागे दुचाकीवरून जात होता. पुढे गेल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ते वारी रस्त्यावर संवत्सर शिवारातील अमर ठाकरे यांच्या घरासमोर ट्रॅक्टर उलटला. त्याखाली कल्पेश व चालक दीपक हे दोघे दबलेले असल्याचे रवी बारवाल याच्या लक्षात आले. त्याने स्थानिकांची मदत घेऊन दोघांनाही बाहेर ओढून काढले. यात चालक दीपक यास काही प्रमाणात दुखापत झाली होती, तर कल्पेश यास जास्त दुखापत झाल्याने तो बेशुद्ध होता. त्यास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास ए. एम. दारकुंडे करीत आहेत.

Web Title: The young man was crushed under the tractor