येळकोट ऽ येळकोट ऽ जयमल्हार !
By Admin | Updated: December 17, 2015 23:40 IST2015-12-17T23:30:38+5:302015-12-17T23:40:01+5:30
पारनेर : पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसाच्या पितळी मूर्तीचा प्रतिष्ठापना व सुवर्णकलशारोहण सोहळा पार पडला.

येळकोट ऽ येळकोट ऽ जयमल्हार !
पारनेर : राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसाच्या पितळी मूर्तीचा प्रतिष्ठापना व सुवर्णकलशारोहण सोहळा गुरुवारी हजारो भाविकांच्या मांदियाळीत व जगदगुरू शंकराचार्य व महंत फलाहारी महाराज यांच्या हस्ते पार पडला.
पारनेर तालुक्यातील क्षेत्र कोरठण खंडोबा राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. गुरूवारी चंपाषष्टी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे खंडोबाच्या मंगलस्नानाने महोत्सवास सुरवात झाली. त्यानंतर सकाळी सहा वाजता खंडोबाची पूजा व आरती झाली.
आठ वाजता गोरेगाव ग्रामस्थांच्या दिंडी सोहळ्याचे आगमन देवस्थाननजीक झाल्यावर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर देवस्थान व भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेल्या खंडोबा -म्हाळसा यांच्या पितळी मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना व सुवर्ण कलशारोहण सोहळा करवीरपीठाचे शंकराचार्य व मथुरा वृंदावन येथील फलाहारी महाराज यांच्या हस्ते पार पडला.
शंकराचार्य म्हणाले, धार्मिक आचरणातून सुसंस्कारित समाज घडविण्याची जबाबदारी आता संत, महंतांवर आली असून यामधूनच अध्यात्म व आत्मसन्मान जोडले जाणार आहे. त्यानंतर रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन झाले. उत्सवमूर्तीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढून मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. नंतर महंत फलाहारी महाराज यांनी आशीर्वचन दिले. ते म्हणाले, चंपाषष्ठी महोत्सवाला विशेष महत्व असून यातून कोरठण खंडोबाच्या भूमीत एक धार्मिक अधिष्ठान तयार झाले आहे.
यावेळी तहसीलदार भारती सागरे, पारनेर तालुका सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष गणेश कावरे, सुनील कावरे, देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, रामदास मुळे, राहुल पुंडे हजर होते. (तालुका प्रतिनिधी)