ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरूच
By Admin | Updated: July 14, 2014 00:56 IST2014-07-14T00:30:09+5:302014-07-14T00:56:52+5:30
अहमदनगर : ग्रामसेवक युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवार १ जुलैपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरूच
अहमदनगर : ग्रामसेवक युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवार १ जुलैपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात युनियनचे ७०० ग्रामसेवक सहभागी झाले असल्याचा दावा युनियनच्यावतीने तर जिल्हा परिषदेकडून ५०० ग्रामसेवक संपावर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आंदोलनामुळे जिल्ह्यातील पाचशेच्या जवळपास ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे.
नरेगासह अन्य वेतनश्रेणी वाढविण्यात यावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवा काळ निश्चित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियन राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला १ तारखे पासून सुरू वात झाली असून येत्या ४ आणि ५ तारखेला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवक वगळता ७०० ग्रामसेवक सहभागी झाले असल्याचा दावा युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केला आहे.
केवळ विकास कामे, दाखले आणि नरेगाची कामे थांबविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नरेगात प्रशासन विनाकारण ग्रामसेवकांवर कारवाई करत असून आता पर्यंत जिल्ह्यात २७ ग्रामसेवकांना विनाकारण निलंबीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात १ हजार ११२ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. यातील निम्मे ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. यामुळे त्यांच्याकडे कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांच्या ग्रामपंचायतींचा चार्ज देण्यात आलेला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतींत किमान कामे सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने आंदोलन सुरू झाल्यानंतर ३ जुलैलाच आंदोलनात सहभागी झालेल्यांना नोटीस बजावून कामावर हजर होण्याचे आदेश दिलेले असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आलेली असून सध्या मुंबईत विभागनिहाय साखळी धरणे आंदोलन आणि धरणे सुरू आहे. सोमवार पासून आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे. सर्व मंत्री आणि नेत्यांना भेटून ग्रामसेवकांच्या व्यथा सांगितल्या आहेत. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीकडे ग्रामसेवकांचे डोळे लागले आहे.
-एकनाथ ढाकणे, अध्यक्ष ग्रामसेवक युनियन.