कामगारांचा मूक मोर्चा
By Admin | Updated: August 23, 2014 00:44 IST2014-08-22T23:23:08+5:302014-08-23T00:44:02+5:30
राहुरी : संचालक मंडळाशी वाटाघाटी फिसकटल्याने राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता राहुरी शहरातून मूक मोर्चा काढला़

कामगारांचा मूक मोर्चा
राहुरी : संचालक मंडळाशी वाटाघाटी फिसकटल्याने राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता राहुरी शहरातून मूक मोर्चा काढला़
शुक्रवारी सकाळी कारखान्यावर कामगारांनी एक तास मौन पाळले़ कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी कामगारांशी चर्चा केली़ यावेळी झालेल्या चर्चेत तनपुरे यांच्याशी अर्जुन दुशिंग, सुरेश थोरात, आप्पासाहेब गावडे, अशोक नगरे, सिताराम नालकर, चंद्रकांत कराळे यांनी चर्चा केली़ कामगारांचे दोन महिन्याचे पगार द्यावे अशी मागणी कामगारांनी केली़ कारखान्याकडे सध्या पैसे नाहीत़ फायनान्स कंपनी आठवडाभरात येणार असून त्यानंतर होणाऱ्या बैठकीनंतर पगाराचे नियोजन होईल, असे तनपुरे यांनी सांगितले़
कामगारांचे पगार पोळ्यापूर्वी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली़ सप्टेंबरच्या अगोदर कारखान्याची सर्वसाधारण सभा घेण्यात येईल, असे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी स्पष्ट केले़ कामगारांनी सहकार्य करुन आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन तनपुरे यांनी केले़ मात्र कामगारांनी पगार केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली़
राहुरी येथील खरेदी विक्री संघाच्या आवारात कामगार जमा झाले़ विद्यमान अध्यक्ष तनपुरे, माजी अध्यक्ष रामदास पाटील धुमाळ यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय कामगारांनी मागे घेतला़ भिकमागो आंदोलनही रद्द करण्यात आले़ राहुरी शहरातून कामगारांनी मुक मोर्चा काढला़ मोर्चा पुन्हा राहुरी खरेदी विक्री संघाच्या आवारात आला़
मोर्चासमोर प्रकाश तारडे, अशोक नगरे, सिताराम नालकर, सुरेश थोरात, सोमनाथ वाकडे, भरत पेरणे, चंद्रकांत कराळे, अर्जुन दुशींग, आप्पासाहेब गावडे यांची भाषणे झाली़ येत्या रविवारी कारखान्यावर कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल असे आप्पासाहेब गावडे यांनी सांगितले़
(तालुका प्रतिनिधी)