खड्डे बुजविण्याचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:16+5:302021-01-03T04:22:16+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील चिंभळे-पारगाव सुद्रिक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थांनी बंद ...

खड्डे बुजविण्याचे काम पाडले बंद
श्रीगोंदा : तालुक्यातील चिंभळे-पारगाव सुद्रिक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. मात्र, खड्डे बुजविल्यानंतर अल्पावधीतच ते उखडत आहेत. त्यामुळे हे खड्डे कशासाठी बुजविले जातात, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. खड्डे बुजविण्यापूर्वी त्याची साफसफाई करायला हवी. मात्र, तसे न करता खड्ड्यात थेट डांबर टाकले जाते. तसेच लहान-मोठी खडी योग्य प्रमाणात वापरली जात नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंतेही लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासनाचा खड्डे बुजविण्याचा कोट्यवधींचा निधी पाण्यात जात आहे. दोन दिवसांपूर्वी खामकरवाडी सोसायटीचे अध्यक्ष आशिष लडकत व त्यांच्या सहकाऱ्यांनी खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू आहे, असा आरोप केला.
---
खड्डे बुजविताना योग्य दक्षता घ्या. अशा सूचना अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत. एखाद्या कामाची तक्रार आली आणि त्यात तथ्य आढळले, तर संबंधित ठेकेदारास बिल अदा केले जाणार नाही.
- संजय पवार,
कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग
----
निकृष्ट कामे पाहता श्रीगोंद्यात खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदारांची बिले काढण्यासाठी केली जातात की काय, अशी परिस्थिती आहे. कामाकडे कोणताही अधिकारी फिरकत नाही. अशी कामे झाली तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीगोंदा येथील कार्यालयास टाळे ठोकणार आहे.
-बाळासाहेब नाहाटा,
माजी सभापती, श्रीगोंदा बाजार समिती