शिर्डीत साजरे होतेय महिला सन्मान वर्ष; लोहार-सुतार समाजाची मुलगी शाळेत जाण्याच्या घटनेची शतकपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:25 IST2018-01-29T21:15:50+5:302018-01-29T21:25:20+5:30
शिर्डीत लोहार समाजातील पहिली मुलगी शाळेत जाण्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील गाडी लोहार-सुतार समाजाच्या वतीने हे वर्ष समाजातील महिलांसाठी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल.

शिर्डीत साजरे होतेय महिला सन्मान वर्ष; लोहार-सुतार समाजाची मुलगी शाळेत जाण्याच्या घटनेची शतकपूर्ती
शिर्डी : शिर्डीत लोहार समाजातील पहिली मुलगी शाळेत जाण्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील गाडी लोहार-सुतार समाजाच्या वतीने हे वर्ष समाजातील महिलांसाठी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्त समाजातील मुलींचे शिक्षण, आरोग्य व सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गाडी लोहार-सुतार संघटनेचे अध्यक्ष हिरामण वारूळे यांनी सोमवारी जाहीर केले.
समाजाच्या वतीने सोमवारी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर, नितीन कोते, दत्तात्रय कोते, रवींद्र गोंदकर, छाया पोपट शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात स्वच्छता अभियान सुरू असून शहर राज्यातील पहिल्या तीस शहरात आले आहे. नागरिकांनी थोडा आणखी प्रयत्न केल्यास सार्इंची शिर्डी स्वच्छतेत राज्यात पहिली येऊ शकेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नितीन कोते व सुजित गोंदकर यांनी यावेळी केले.
गेल्या एकवीस वर्षांपासून शिर्डीत विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येते. यंदा सर्व महिलांनी रेशमी फेटे परिधान केले होते. त्यापूर्वी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यात सुनील वारुळे, चंद्रकांत वारूळे, पंकज सुरेश हारळे, मच्छिंद्र वारूळे, भूषण भालेराव, नरसिंग पवार, सोमनाथ वारूळे, विपीन सुभाष वारूळे, विकी सुरेश वारूळे, गणेश राधाकिसन वारूळे आदींसह मोठ्या प्रमाणावर समाजबांधव व नागरिक सहभागी झाले होते.
बबईबाई वारूळे लोहार समाजातील पहिल्या विद्यार्थिनी
साईबाबा समाधीस्त होण्यापूर्वी मंगळवार, ३ सप्टेंबर १९१८ रोजी बबईबाई नथु वारूळे यांच्या रूपाने लोहार समाजातील पहिली महिला शाळेत गेली. या ऐतिहासिक घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष संस्मरणीय करण्यासाठी समाजातील तरुणांचा विशेष प्रयत्न आहे. त्यादृष्टीने समाजातर्फे हे महिला सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. समाजातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, तिचे पैशाअभावी शिक्षण अडणार नाही याकडेही लक्ष देण्यात येणार आहे.