‘विकेल ते पिकेल’ या योजनेत महिलांनी सहभागी व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:31+5:302021-03-10T04:21:31+5:30
केडगाव : ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत महिलांना सहभागी करून घेऊन त्यांच्या फळे, भाजीपाला आदी शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध ...

‘विकेल ते पिकेल’ या योजनेत महिलांनी सहभागी व्हावे
केडगाव : ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत महिलांना सहभागी करून घेऊन त्यांच्या फळे, भाजीपाला आदी शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. त्यांचे सक्षमीकरण केले जाईल. मधुमक्षिका पालनाने कांदा बीजोत्पादन, फळ पिके या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होतो, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे कृषी विभागाच्या वतीने आत्मा अंतर्गत महिलांसाठी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास टाकळी काझीच्या सरपंच सुनीता ढगे, सारोळा बद्दीचे सरपंच सचिन लांडगे, मधुमक्षिका पालन प्रशिक्षक नानासाहेब इंगळे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, कृषी सहाय्यक बाळासाहेब जावळे, ‘आत्मा’चे उमेश डोईफोडे, श्रीकांत जावळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
नवले पुढे म्हणाले, मधमाशा पालन हा उद्योग शेतीपूरक व्यवसाय आहे. यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत केली जाते. संपूर्ण देशी तंत्रज्ञ व सर्वांना हा व्यवसाय करता येतो. इतर उद्योगांशी स्पर्धा न करणारा हा एकमेव उद्योग आहे. मधुमक्षिका पालनामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मदत होते.
प्रशिक्षक नानासाहेब इंगळे यांनीही माहिती दिली. यावेळी सरपंच सुनीता ढगे, सचिन लांडगे आदींनीही मार्गदर्शन केले.