टाकाऊपासून टिकाऊ संकल्पना महिलांनी पुढे न्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:36+5:302021-03-10T04:21:36+5:30
: महिलांनी आरोग्याबाबत जागृत राहून अनुभवातून पुढे जायचे आहे. टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना महिलांनी पुढे घेऊन जात आपली स्वप्ने ...

टाकाऊपासून टिकाऊ संकल्पना महिलांनी पुढे न्यावी
: महिलांनी आरोग्याबाबत जागृत राहून अनुभवातून पुढे जायचे आहे. टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना महिलांनी पुढे घेऊन जात आपली स्वप्ने पूर्ण करा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.
बाभळेश्वर (ता. राहाता) येथे जनसेवा फाउंडेशन लोणी आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरअंतर्गत आयोजित ऑनलाइन प्रवरा वेबिनारअंतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विखे बोलत होत्या. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. यु. डी. चव्हाण, पुणे येथील आयुर्वेदतज्ज्ञ भारती लेले, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि पायरेन्सचे सचिव डॉ. संभाजी नालकर, जनसेवा फाउंडेशनचे सचिव डॉ. अशोक कोल्हे, कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख अनुराधा वांढेकर, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे उपस्थित होते.
शालिनी विखे म्हणाल्या, महिला ही बचत गटातून सक्षम होत आहे. जनसेवा फाउंडेशन लोणी आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरमार्फत महिला संघटन, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसायातून महिलांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. आरोग्याच्या बाबतीत आणि कृषी क्षेत्राबाबत माहिती देताना महिला बचतगटांनी ज्ञान आणि अनुभवातून प्रगती केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनदेखील महिला बचतगटांना मदत केली जाते. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना केवळ व्यावसायिक ज्ञान देऊन त्यांच्या उत्पादित मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचत गटातून महिला उभी राहत असल्याचा मोठा आनंद असला तरीदेखील महिलांनी आरोग्य, घटती वयोमर्यादा, कुपोषण यासाठी नैसर्गिक शेती आणि परसबागेला महत्त्व देण्याची गरज व्यक्त करून नाचणी, पालेभाज्या, जुने वाण, आयुर्वेद या गोष्टी समजून घेत टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना पुढे घेऊन जावी. कोरोनाने आपल्याला खूप काही शिकविले. अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे. सर्व महिलांनी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे चव्हाण यांनी स्वच्छ पालेभाज्या, फळाचा वापर, आहार, विहार आणि आचार विचार या त्रिसूत्रीवर मार्गदर्शन केले. महिलांच्या विविध आजारांवर मार्गदर्शन करताना डॉ. भारती लेले यांनी आयुर्वेदाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी डॉ. अशोक कोल्हे यांनी महिला सक्षमीकरण आणि कुपोषण यावर मार्गदर्शन केले.
प्रारंभी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग, बचतगट, चळवळ याचा आढावा घेतला.
०९ शालिनी विखे