प्रक्रिया उद्योगातून महिलांनी सबलीकरण करावे - डॉ. मिलिंद अहिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:15+5:302021-04-02T04:21:15+5:30
राहुरी : प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या ज्ञानाचा अवलंब करुन प्रक्रिया उद्योग सुरु करुन महिलांनी सबलीकरण करावे. अल्प शेतीवर प्रक्रिया उद्योग ...

प्रक्रिया उद्योगातून महिलांनी सबलीकरण करावे - डॉ. मिलिंद अहिरे
राहुरी : प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या ज्ञानाचा अवलंब करुन प्रक्रिया उद्योग सुरु करुन महिलांनी सबलीकरण करावे. अल्प शेतीवर प्रक्रिया उद्योग सुरु करुन देशापुढे आपले उदाहरण ठेवावे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात दोन दिवसीय महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच संपन्न झाला. यावेळी अहिरे बोलत होते. प्रशिक्षणास २५ महिला उपस्थित होत्या.
(अहिरे)
.................
महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा
चांंदेकसारे : पोहेगाव परिसरात विजेचा खेळखंडोबा वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामध्ये वीज वितरण कंपनीने सुधारणा करावी, अशी मागणी ग्रामस्थ व्यापारी, शेतकऱ्यांकडून होत आहे. परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांच्या मोटारी चालत नाही. त्यामुळे भरणे उरकत नाही. पाणी असूनही पिकांना देता येत नाही. कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने हाॅटेल व्यावसायिक वैतागले असून प्रचंड उष्णतेमुळे शीतपेये खराब होत आहेत. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे पीठगिरणीधारक वैतागले आहेत. वीज वितरण कंपनीने पूर्णदाबाने सुरळीत करावा अशी मागणी पोहेगाव परिसरातून होत आहे.
................
मानोरी ग्रामपंचायमध्ये शिवजयंती साजरी
वळण : राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी सरपंच अब्बासभाई शेख , पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, शामराव आढाव, अण्णासाहेब तोडमल, दिलावर पठाण, बाबासाहेब आढाव, बाबासाहेब मकासरे, नशीरभाई शेख उपस्थित होते.
.......................
वीज सबस्टेशन काम पूर्णत्वास
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत सबस्टेशनवरील भार कमी करण्यासाठी नव्याने उभारलेल्या चिंचोली गुरव येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे काम पूर्णत्वास आले आहे. या कामाची थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी पाहणी केली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. याप्रसंगी उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, माजी सभापती अविनाश सोनवणे सहित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
........................
४ हजार कांदा गोण्यांची आवक
श्रीरामपूर : श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी ४ हजार ३०० कांदा गोणीची आवक होती. सर्वाधिक भाव १२०० रुपये प्रतिक्विंटल प्रथम श्रेणीच्या कांद्यास मिळाला. प्रथम श्रेणीच्या कांद्यास ९०० ते १२००, द्वितीय ६०० ते ९००, तृतीय २५० ते ६०० व गोल्टी कांद्यास ५०० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल विकला गेला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी परिपक्व कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे व उपसभापती नितीन भागडे, सचिव किशोर काळे यांनी केले आहे.
-----............
टपाल सेवा विस्कळीत
पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा गावासाठी श्रीरामपूर, कोपरगाव आगाराने नियमित धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्या कमी केल्याने पोस्टाच्या टपाल सेवा विस्कळीत झाली आहे. श्रीरामपूर आगार व कोपरगाव आगाराने बस फेऱ्या बंद केल्याने ग्रामीण भागात पोहाेचणारे टपाल सेवा विस्कळीत झाली आहे .श्रीरामपूर पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत ४९ मोठे पोस्ट ऑफिस, २७५ ब्रांच पोस्ट ऑफिसांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.