चार नगरपालिकांचा कारभार महिलांच्या हाती
By Admin | Updated: July 10, 2014 00:36 IST2014-07-09T23:46:07+5:302014-07-10T00:36:10+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील श्रीगोंदा वगळता इतर सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या १८ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे़

चार नगरपालिकांचा कारभार महिलांच्या हाती
अहमदनगर: जिल्ह्यातील श्रीगोंदा वगळता इतर सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या १८ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे़ त्यामुळे प्रशासकाची नेमणूक औटघटकेची ठरली आहे़
जिल्ह्यात श्रीगोंदा वगळता इतर आठ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे़ नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षणही जाहीर करण्यात आले असून, निम्म्या नगरपालिकांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे़ राहाता नगरपालिका नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे़ तर राहुरी, कोपरगाव आणि संगमनेरचे नगराध्यक्षपद सार्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे़ उर्वरित श्रीरामपूर- ओबीसी व्यक्ती, देवळाली प्रवरा व पाथर्डीचे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे़ त्यामुळे निम्म्या नगरपालिकांवर महिला राज येणार असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़
श्रीगोंदा नगरपालिका वगळता संगमनेर, कोपरगाव, राहाता आणि देवळाली प्रवरा या सात नगरपालिकांची निवडणूक डिसेंबर २०११ मध्ये झाली़ शिर्डी नगरपंचायतीचीही निवडणूक याचवेळी झाली असून, नगराध्यक्षांची निवड २२ डिसेंबर २०११ करण्यात आली होती़
नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाल ५ जुलै रोजी संपुष्टात आला होता़ मात्र विधानसभा निवडणूक असल्याने सत्ताधाऱ्यांनी नगराध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला
होता़
परंतु उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली़ त्यामुळे शासनाने नगराध्यक्षांना दिलेल्या मुदतवाढीचा निर्णय मागे घेतला़
परिणामी नगराध्यक्षांची मुदत संपल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आठ नगरपालिकांवर प्रशासकाची नेमणूक केली असून, नवीन नगराध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)