आयुष्यभर चाकरी करीन पण कर्ज द्या!

By Admin | Updated: June 7, 2014 00:19 IST2014-06-06T23:20:38+5:302014-06-07T00:19:28+5:30

योगेश गुंड, अहमदनगर गरीब घरचा असला तरी त्याचा परीक्षेत पहिला क्रमांक आलेला, मित्र-नातेवाईक या सर्वांची कौतुकाची थाप पाठीवर पडली,

Will lend a lifetime, but lend it! | आयुष्यभर चाकरी करीन पण कर्ज द्या!

आयुष्यभर चाकरी करीन पण कर्ज द्या!

योगेश गुंड, अहमदनगर
गरीब घरचा असला तरी त्याचा परीक्षेत पहिला क्रमांक आलेला, मित्र-नातेवाईक या सर्वांची कौतुकाची थाप पाठीवर पडली, उन्हाळ्याच्या सुट्टीत मौजमजा करण्यासाठी तो मामाच्या गावाला जायची तयारी करतो आणि अचानक त्याला ‘ब्लड कॅन्सर’ झाल्याचे निदान होते, हे ऐकताच साऱ्या घरावर आभाळ कोसळतं, वाऱ्या वादळात घर ही पडलं अशा नियतीच्या खेळात आपल्या एकुलत्या एक चिमुकल्याला वाचविण्यासाठी एका शेतमजुराची झुंज चालू आहे.
या चिमुकल्याचे नाव आहे सागर संजय मंडले (वय १२) त्याचे वडील कामरगाव (ता. नगर) येथे झोपडीवजा घरात राहतात. शेतात मोलमजुरी करुन संजय मंडले कष्टाने मिळालेले दोन घास आनंदाने आपल्या घरच्यांना भरवत होता. एकुलता एक मुलगा सागर शाळेत हुशार होता. बापाच्या वाटेला आलेल्या संघर्षमय जीवनाची त्याला जाणीव होती. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीतही तो भविष्याचे स्वप्न रंगवत सुप्यातील माध्यमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकतोय. सहावीत त्याचा पहिला नंबर आल्याने सागरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
वडील मोलमजुरी करणारे असूनही पोराच्या हुशारीने त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. आई-बापाचा लाडका सागर सुट्टीत मौजमजा करण्यासाठी मामाच्या गावाला जाण्याचा बेत आखतो. मात्र अचानक त्याच्या त्वचेवर पुरळ उठू लागले. गावातील डॉक्टरांनी शहरात एका खासगी दवाखान्यात त्याची तपासणी केली असता त्याला ‘ब्लड कॅन्सर’ असल्याचे निदान होते. आई-वडिलांवर तर आभाळच कोसळले. सागरचे वडील कशीतरी मोलमजुरी करुन महिन्याकाठी तीन हजार रुपये कमवून आपले घरटे चालवतात. घरात वृद्ध आई, एक मुलगी, सागर, सागरची आई अशा पाच जणांच्या या कुटुंबावर समस्यांचे मोठं आभाळ कोसळल्याने ते खचलेत.
उपचारासाठी लागणारे पैसे जमवण्यासाठी शेतीही नाही विकायला. ज्या घरात राहतात त्याच घराची वाऱ्या वादळाने दैना उडवून संकटात अजूनच भर घातली. नियतीच्या या खेळात सागरचे आईवडील पुरते खचून गेलेत. डॉक्टरांनी हा आजार प्रथम अवस्थेत असल्याचे सांगून त्याला महागडी इंजेक्शने, केमोथेरपी, इतर औषधे असा सर्व मिळून तीन ते चार लाखांपर्यंत खर्च लागणार असल्याचे सांगितल्याने हे कुटुंब मोठ्या धर्मसंकटात सापडले आहे. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन निधी संकलनासाठी प्रयत्न चालवले आहेत.
त्यासाठी तुकाराम कातोरे, भास्कर भुजबळ, शाम जाधव, सुदाम ठोकळ, मनोज शितोळे हे प्रयत्नशील आहेत. मात्र उपचारासाठी अजून निधीची गरज आहे. संजय मंडले यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेत ३३८६२६९५८१५ या क्रमांकाने खातेही उघडले आहे.
घरही पडल्याने देवळात मुक्काम
घरातील एकुलत्या एक पोरावर असा दुर्दैवी प्रसंग ओढावला असताना त्यात निसर्गानेही कुठला कसूर ठेवला नाही. गुरुवारच्या वाऱ्यावादळाने मंडले यांचे घरही कोसळले. आता रहायलाही घर नसल्याने या कुटुंबाचा मुक्काम सध्या देवळात आहे. नियतीच्या या खेळापुढं कुटुंब हतबल झालंय.
मदत नको, कर्ज द्या
‘‘माझ्या एकुलत्या एक मुलाला बरं करण्यासाठी मी आयुष्यभर कुणाचीही चाकरी करण्यास तयारी आहे. मला मदत नको, कर्ज द्या मी आयुष्यभर घाम गाळून पै न् पै फेडीन’’
- संजय मंडले (सागरचे वडील)

Web Title: Will lend a lifetime, but lend it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.