बिनविरोध निवडणुकीसाठी नेतेमंडळी धारिष्ट दाखवतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:10+5:302021-01-03T04:21:10+5:30

रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मात्तबर नेते मंडळींच्या ताब्यात असलेल्या तालुका स्तरावरील सर्वच आर्थिक लाभाच्या ...

Will the leaders show determination for unopposed elections? | बिनविरोध निवडणुकीसाठी नेतेमंडळी धारिष्ट दाखवतील का?

बिनविरोध निवडणुकीसाठी नेतेमंडळी धारिष्ट दाखवतील का?

रोहित टेके

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मात्तबर नेते मंडळींच्या ताब्यात असलेल्या तालुका स्तरावरील सर्वच आर्थिक लाभाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्याप्रमाणे बिनविरोध करतात. त्याचप्रमाणे तालुक्यातील होऊ घातलेल्या २९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध करण्याचे उद्या (रविवारी) अर्ज माघारीच्या दिवशी धारिष्ट दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी सुमारे ९६३ इतके उमेदवारी अर्जही दाखल झाले आहेत. ४ जानेवारीला अर्ज माघारीसह चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार निवडणुका बिनविरोध करण्यासाठीचा खऱ्या अर्थाने अखेरचा दिवस आहे. तालुक्याच्या राजकारणातील कोल्हे, काळे व परजणे या मात्तबर नेते मंडळींपैकी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका बिनविरोध कराव्यात, अशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागलीच भूमिका व्यक्त केली होती; परंतु यावर आ. आशुतोष काळे व माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तसेच इतर राजकीय पक्षांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होऊच नये अशी तर या नेत्यांची भूमिका नाहीना, अशीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

गेली दहा महिने तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कमी करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला घरात बसण्याचा, कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा, गर्दी न करण्याचा, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा मोफत सल्ला देण्याचे काम आ. आशुतोष काळे व माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्यासह अनेकांनी केले आहे; परंतु या निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत, तर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी प्रचारासाठी २९ गावांतील प्रत्येक घराघरात वारंवार जाणार आहेत. यातून संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. अशा वेळी जनतेच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे कायमच तालुक्यातील जनतेप्रती खूप कळवळा असलेली मात्तबर नेते मंडळी त्याच जनतेच्या हितासाठी आपली राजकीय अभिलाषा बाजूला ठेवून निवडणुका बिनविरोध करतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

........

या ग्रामपंचायतींची निवडणूक

सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा.

...

Web Title: Will the leaders show determination for unopposed elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.