आदर्श गावात ‘आदर्श योजना’ राबविणार
By Admin | Updated: August 12, 2014 23:18 IST2014-08-12T22:57:43+5:302014-08-12T23:18:37+5:30
अहमदनगर : राज्यात आदर्श गाव योजनेत निवड करण्यात आलेल्या गावात आदर्श योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदर्श गावात ‘आदर्श योजना’ राबविणार
अहमदनगर : राज्यात आदर्श गाव योजनेत निवड करण्यात आलेल्या गावात आदर्श योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात निवड झालेल्या गावाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापक बसविणे, मीटर पध्दतीने पिण्याचे पाणी देणे, गुणवत्ता पूर्ण प्राथमिक शिक्षण देणे, डिजीटल अंगणवाड्या तयार करणे यांचा समावेश राहणार असल्याची माहिती आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेत आदर्श गाव योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अधीक्षक कृषी अंकुश माने आणि अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातून या योजनेत ९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात नगर तालुक्यातून भोयरे पठार, भोयरे मांजरसुंभे. पारनेर तालुक्यातील पिंपळी गवळी, टाकळीढोकेश्वर, निवडुंगेवाडी, नेवासा तालुक्यातून मोरेचिंचोेरे, राहाता पिंपरी निर्मळ आणि संगमनेर तालुका रणखांब यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरीय बैठकीत निवड झालेल्या गावात आदर्श योजना राबविण्याबाबत चर्चा झाली. यात पाण्याचे वॉटर आॅडीट करण्यासाठी तातडीने येत्या २० तारखेपर्यंत जिल्ह्यातील ९ गावातील ३० पाणलोटात पर्जन्यमापक यंत्रे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गावाला पाणी पुरवठ्यासाठी पाणी योजना असल्यास त्याठिकाणी मीटर लावून पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. संबंधित गावातील अंगणवाडी डिजिटल करण्यात येणार आहेत.