‘वायफाय’ने शेडगाव झाले जगाशी ‘कनेक्ट’
By Admin | Updated: September 7, 2016 00:37 IST2016-09-07T00:31:44+5:302016-09-07T00:37:07+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा व कर्जत तालुक्याच्या सिमेवरील शेडगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे वायफाय झाले आहे.

‘वायफाय’ने शेडगाव झाले जगाशी ‘कनेक्ट’
श्रीगोंदा : श्रीगोंदा व कर्जत तालुक्याच्या सिमेवरील शेडगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे वायफाय झाले आहे. या सेवेमुळे युवकांची जगाशी कनेक्टेव्हिटी झाली. आता शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाचे भाव, हवामानाचा अंदाज मिळू लागला आहे.
शेडगावची लोकसंख्या सुमारे ४ हजार असून पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी टाकळीकडेवळीत, जलालपूर, पेडगाव परिसरातील विद्यार्थी शेडगावला येतात. शेती समृध्द असल्याने शेडगाव प्रगतीच्या उंबरठ्यावरील कृषिप्रधान गाव आहे.
शेडगाव जगाशी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडले जावे यासाठी सरपंच विजय शेंडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वायफाय सेवा देण्यासाठी सुमारे २०० मीटरची रेंज असलेले मशीन बनविले. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयापासून २०० मीटरचा परिसर वायफाययुक्त झाला आहे.
या वायफाय सेवेचा शेतकरी, नागरिक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पासवर्ड देण्यात आला आहे. या सेवेमुळे शेडगावमधील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची जगाशी मोफत कनेक्टेव्हिटी झाली असून शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजार भाव, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी या सेवेचा उपयोग होऊ लागला आहे. या मोफत सेवेमुळे गावातील नागरिकांची इंटरनेट सेवेच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.
श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या नेतृत्वाखाली विजय शेंडे यांना काम करण्याची संधी मिळाल्यानंतर शेंडे यांनी अभ्यास करून माहिती व तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शेडगाव येथे विकास योजना राबविण्यासाठी पावले उचलली. सुरुवातीला ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ लावण्याचा उपक्रम हाती घेतला. नंतर गाव वायफाय केले आणि आता गावातील रस्ते, गटार सांडपाणी, आरोग्याचे प्रश्न याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी लोकसहभाग देण्यासाठी शेडगावकरांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शेडगावचा भविष्यात निश्चितच चेहरा बदलून एक ग्लोबल व्हिलेज म्हणून शेडगाव भारताच्या नकाशावर झळकेल.
(तालुका प्रतिनिधी)