पत्नीने जावई, मुलींच्या मदतीने पतीला झाडाला बांधून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:04+5:302021-07-07T04:27:04+5:30

तिसगाव (जि. अहमदनगर) : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून पत्नीनेच जावई व दोन मुलींच्या मदतीने पतीला झाडाला बांधून मारहाण करीत खून ...

The wife killed her husband by tying him to a tree with the help of her son-in-law and daughters | पत्नीने जावई, मुलींच्या मदतीने पतीला झाडाला बांधून केला खून

पत्नीने जावई, मुलींच्या मदतीने पतीला झाडाला बांधून केला खून

तिसगाव (जि. अहमदनगर) : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून पत्नीनेच जावई व दोन मुलींच्या मदतीने पतीला झाडाला बांधून मारहाण करीत खून केल्याची घटना तिसगाव (ता. पाथर्डी) येथील नरवडे वस्तीवर घडली. रविवारी झालेल्या घटनेप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

राधाकिसन नंदराम नरवडे (वय ६२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मयताचा आतेभाऊ लक्ष्मण भीमराज अडसरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादित म्हटले आहे, मयत राधाकिसन नरवडे व त्यांची पत्नी गयाबाई यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. मुलगा हा भोळसर आहे. तीनही मुलींचे लग्न झालेले असून, त्या सासरी नांदत आहेत. राधाकिसन नरवडे यांच्या नावावर असलेली वडिलोपार्जित जमीन पत्नी गयाबाई हिने सुमारे दहा वर्षांपूर्वी फसवून स्वतःच्या नावे केली. त्यानंतर पती राधाकिसन व सासू शहाबाई यांना घराबाहेर काढले. तेव्हापासून राधाकिसन हे आईसोबत वेगळे राहत होते. त्यामुळे राधाकिसन हे संबंधित जमीन वहिवाट करण्यास सतत हरकत घेत होते. त्यावरून त्यांचे सतत वाद होत होते. त्यामुळे जमीन पडीक होती. रविवारी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी पत्नी गयाबाई, जावई संदीप महादेव ढाळे, मुलगी मीरा व अनिता यांनी राधाकिसन यांना लिंबाच्या झाडाला बांधून लाकडी दांडक्याने मारहाण केली. याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी अडसरे हे घटनास्थळी पोहोचले; परंतु त्यांना तेथून पिटाळून लावण्यात आले. काही वेळाने तेथे पोलीस दाखल झाले. पोलिसांनीच रुग्णवाहिकेतून राधाकिसन यांना दवाखान्यात नेले. उपचारापूर्वीच राधाकिसन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लक्ष्मण अडसरे यांच्या फिर्यादीवरून पत्नी गयाबाई राधाकिसन नरवडे, जावई संदीप महादेव ढाळे, मुलगी मीरा संदीप ढाळे व मुलगी अनिता अशोक झिरपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ अधिक तपास करीत आहेत.

..........

गुन्हा दाखल करण्यावरून वाद

मयताचे शवविच्छेदन सोमवारी अहमदनगर येथे करण्यात आले. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. त्यावरून पोलीस व नातेवाइकांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात वातावरण तणावपूर्ण झाले. उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. सोमवारी रात्री उशिराने पाथर्डी पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The wife killed her husband by tying him to a tree with the help of her son-in-law and daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.