Lok Sabha Election 2019 : काँग्रेसमध्ये का थांबावे? : अहमदनगरच्या माजी जिल्हाध्यक्षाचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 18:47 IST2019-03-21T18:40:21+5:302019-03-21T18:47:54+5:30
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही, मात्र माझ्या जागेवर अचानक रात्रीतून दुसरा जिल्हाध्यक्ष नेमला.

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसमध्ये का थांबावे? : अहमदनगरच्या माजी जिल्हाध्यक्षाचा सवाल
श्रीगोंदा : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही, मात्र माझ्या जागेवर अचानक रात्रीतून दुसरा जिल्हाध्यक्ष नेमला. ही कृती म्हणजे काँग्रेसमधील काही नेत्यांची हुकुमशाही आहे. अशा पद्धतीने कोणी पक्षांतर्गत राजकारण करत असेल तर आपण काँग्रेस पक्षात का थांबावे? असा प्रश्न पडला असल्याचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
शेलार म्हणाले, मी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समर्थक आहे. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विखे यांना मानणा-या कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासमवेत प्रवेश केला. परंतु मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेस पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. विखे पाटील यांनी आपल्यावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली. पक्षवाढीचे काम करत असताना जिल्ह्यात संघटना वाढीसाठी काम केले. मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसताना करण ससाणे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. करण ससाणे यांच्या नियुक्तीबाबत आपल्याला आनंद आहे. मात्र, अशा पद्धतीने कोणी पक्षांतर्गत राजकारण करत असेल तर आपण काँग्रेस पक्षात का थांबावे? असा प्रश्न पडला आहे, असेही शेलार म्हणाले
गटबाजीच्या राजकारणात शेलारांची शिकार
अण्णासाहेब शेलार यांनी काँग्रेस सोडली नाही पण त्यांनी डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाने अण्णासाहेब शेलार यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून रात्रीत उचलबांगडी केल्याचे बोलले जात आहे.