अहिल्यानगर महापालिकेत युती-आघाडी कुणाची? शहर सेनेचाही बालेकिल्ला
By अरुण वाघमोडे | Updated: December 17, 2025 12:29 IST2025-12-17T12:26:51+5:302025-12-17T12:29:10+5:30
भाजप मात्र अजित पवार गटाच्या प्रेमात; संख्याबळ वाढविण्याचे आव्हान

अहिल्यानगर महापालिकेत युती-आघाडी कुणाची? शहर सेनेचाही बालेकिल्ला
अरुण वाघमोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : महायुती एक राहणार की दुभंगणार, हा प्रश्न अहिल्यानगर महापालिकेतही निर्माण झाला आहे. भाजप व शिंदेसेना युती करणार अशी चर्चा मुंबईत आहे. येथे मात्र भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटात दिलजमाई दिसते. त्यामुळे आघाडी व युती कशी होणार? यावर समीरकणे अवलंबून आहेत.
गत पंचवार्षिकला या महापालिकेत एकत्रित असलेल्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सेना दुभंगल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादी गतवेळी एकत्रित होती. त्यांनी कधी भाजपची, तर कधी सेनेची साथ करत सत्ता उपभोगली. यावेळी राष्ट्रवादीही दुभंगली आहे. त्यामुळे भाजप, ठाकरे गट, शिंदेसेना, अजित पवार गट, शरद पवार गट या सर्वांचीच या निवडणुकीत परीक्षा आहे.
एकूण प्रभाग किती आहेत? - १७
एकूण सदस्य संख्या किती? - ६८
सेना काय निर्णय घेणार?
काँग्रेस आजही गलितगात्र दिसत आहे. भाजप स्वबळाची चाचपणी करत आहे. शहरात अजित पवार गटाचे आमदार आहेत. भाजप व अजित पवार गट एकत्र येऊन निवडणुका लढवेल, असे प्राथमिक चित्र आहे. शिवसेनेचे दोन्ही गट काय निर्णय घेणार यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
शिवसेना (एकत्रित) - २३
राष्ट्रवादी (एकत्रित) - १८
भाजप - १६
काँग्रेस - ९
बसपा - ४
सपा - १
अपक्ष - १
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती ?
एकूण मतदार - २,५६,७१९
पुरुष मतदार - १,३२,१३२
महिला मतदार - १,२४,५८७
आता एकूण किती मतदार?
एकूण मतदार - ३,०७,००९
पुरुष मतदार - १,५५,५२३
महिला मतदार - १,५१,३७८
इतर - १०८
कोणते मुद्दे निर्णायक?
पाणी: अमृत, फेज टू योजना राबवूनही शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही. बहुतांशी प्रभागांत नागरिकांना आजही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही.
रस्ते: शहरातील दर्शनी भागातील रस्ते चकाचक दिसत असले तरी अंतर्गत भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली नाही.
अतिक्रमण: शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत.
रोजगार: अहिल्यानगर शहर व एमआयडीसी विकसित न झाल्याने रोजगाराचा प्रश्न आहे.
सार्वजनिक वाहतूक : रस्ते अरुंद असल्याने सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न कायम आहे.
एकहाती सत्तेसाठी ३५ जागा
गत निवडणुकीप्रमाणेच यावेळी महापालिकेत १७ प्रभाग, त्यात प्रत्येकी चार सदस्य असे ६८ लोकनियुक्त नगरसेवक राहणार आहेत. एकहाती सत्ता येण्यासाठी ३४ अधिक एक म्हणजे ३५ नगरसेवक निवडून यायला हवेत.