संगमनेरच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:02+5:302021-09-05T04:25:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : जुलै महिन्यात संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगाव येथील वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी ...

Who will discipline the unruly traffic of Sangamner? | संगमनेरच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार कोण?

संगमनेरच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : जुलै महिन्यात संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगाव येथील वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेरातदेखील वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असून शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होते आहे. त्यामुळे संगमनेरच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार कोण, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याजवळ तीन वर्षांपूर्वी संगमनेर वाहतूक शाखेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. स्वतंत्र वाहतूक शाखेची निर्मिती झाल्यानंतर संगमनेरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागेल, वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होईल तसेच शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा होती. वाहतूक शाखेचा पदभार असलेले तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर तसेच पी.वाय. कादरी यांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची बदली झाली.

तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगाव येथील जिल्हा वाहतूक नावाने स्वतंत्र शाखा सुरू केेल्या होत्या. वाहतूक शाखा बरखास्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे. पुणे, नाशिक, मुंबई या बड्या शहरांच्या मध्यावर संगमनेर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. रुग्णालये, बॅँका, पतसंस्था, खासगी व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, अनेक शिक्षण संस्था, हॉटेल्स यासह विविध उद्योग, व्यवसाय संगमनेरात मोठ्या प्रमाणात असून त्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे संगमनेरात कायमच गर्दी असते. शहराच्या लगतचा परिसर वाढतो आहे.

शहरात मेन रोड, बाजारपेठ, नवीन नगर रोड, बसस्थानक परिसर, दिल्ली नाका, अकोले नाका, मोमीनपुरा, जाणता राजा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशोक चौक, तहसील कार्यालय परिसर, सावरकर मार्ग (लिंक रोड), विद्यानगर, मालदाड रोड, नेहरू चौक, तीनबत्ती चौक आदी ठिकाणी विविध प्रकारची वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आहे. रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहतूक पोलिसांची संख्या कमी झाल्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे प्रमाणही कमी झाले आहे.

---------------

वाहनांचे कर्णकर्कश्श आवाज

अनेक दुचाकी वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांचे सायलेन्सर, हॉर्नमध्ये बदल केला असून कर्णकर्कश्श आवाजाचा नागरिकांना त्रास होतो. अनेक जण रस्त्यांवर दुचाकी वाहनांचे स्टंट करतात, अशांविरुद्ध कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.

----------

सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद

संगमनेर नगर परिषदेने वाहनतळासंदर्भात अद्याप कुठलेही धोरण ठरविलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहनचालक आपली वाहने उभी करतात. सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद पडली. त्यावरील दिवेदेखील गायब आहेत.

फोटो नेम : ०४ बसस्थानकासमोर झालेली वाहतूककोंडी.

Web Title: Who will discipline the unruly traffic of Sangamner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.