अगस्ती बंद पाडायला निघालेय कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST2021-06-19T04:15:29+5:302021-06-19T04:15:29+5:30
अकोले : अगस्ती साखर कारखाना पुन्हा बंद होऊ नये असे तालुक्यातील प्रत्येकाला वाटत आहे. कारखाना बंद झाला तर कामगार, ...

अगस्ती बंद पाडायला निघालेय कोण ?
अकोले : अगस्ती साखर कारखाना पुन्हा बंद होऊ नये असे तालुक्यातील प्रत्येकाला वाटत आहे. कारखाना बंद झाला तर कामगार, ऊस उत्पादक व बाजारपेठ यावर परिणाम होईल. मात्र, अगस्ती बंद पाडायला नेमके कोण निघाले आहे, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर या वादात मिळत नाही.
अगस्ती साखर कारखाना आर्थिक कडेलोटाच्या उंबरठ्यावर असल्याची बाब शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख हे ऊस उत्पादक यांच्यापर्यंत पोहोचवीत आहेत. सुरुवातीला या मोहिमेत बरेच शेतकरी होते. त्यातील काही आता कमी झाले.
कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याची मागणी गैर नाही. आरोप गैर असेल तर या नेत्यांनाही समाजाने जाब विचारला पाहिजे; पण या आरोपांमुळे गळीत हंगाम पूर्वतयारीत कारखान्याची प्रतिमा मलिन होऊन बँका कारखान्यास कर्जपुरवठा करणार नाहीत, असा दावा संचालक मंडळाने केला आहे. संचालक आपल्या स्वमालमत्तेवर बोजा चढवून कारखान्यासाठी कर्ज घेऊन निधी उभा करतात. मात्र, डोईवर कर्ज घेऊनही आमची बदनामी होणार असेल तर एकत्रित राजीनामा देऊ, असा पवित्रा विद्यमान संचालकांनी घेतला आहे.
विनाकारण बदनामी होत असेल तर ते अयोग्य आहे. मात्र, आरोप खरे की खोटे हे सहकार विभागाला ठरवू द्यायला हवे. तो अधिकार सावंत अथवा संचालक मंडळ यापैकी कुणालाही घेता येणार नाही. आर्थिक कारभाराची चिकित्सा करायचीच नाही व त्यावर बोलायचेच नाही, असा दावा संचालक मंडळ करीत असेल तर तेही अयोग्य आहे. सर्वात महत्त्वाचे बँका या आरोप-प्रत्यारोप नव्हे, तर कारखान्याचा ताळेबंद पाहून कर्ज देत असतात. त्यामुळे आरोपांमुळे कारखान्याला कर्ज मिळणार नाही, हा दावा तकलादू वाटतो. सावंत, देशमुख हे कारखान्याची बदनामी करीत असतील तर त्याबद्दल संचालक मंडळाने कायदेशीर कारवाई करायला हवी. राजीनामे देणे हा त्यावरील पर्याय नाही.
तिसरीकडे कामगार संघटनेने सभा घेऊन वेळप्रसंगी कामगार स्वतःच्या माथी कर्ज घेतील, पण कारखाना बंद पडू देणार नाही, असा नारा दिला आहे. ऊसतोडणी कामगारांचे करार, यंत्रसामग्रीची मलमपट्टी वेळेत झाली नाही तर गळीत हंगाम सुरू होणार नाही, अशी भीती व्यक्त करीत तूर्त आरोप-प्रत्यारोप थांबवावेत, असे कामगारांना वाटते.
कामगार कारखान्यावरील तळमळीपोटी बोलत असले तरी त्यांही ही भूमिकाही राजकीय असल्याचा संशय आहे. कारखान्याचा कारभार उत्तम सुरू आहे, याचे ऑडिट कामगार नेते आनंद वायकर यांनी केले आहे का, मग ते कशाच्या आधारे या वादात उतरले आहेत. किती सहकारी साखर कारखान्यांचे कर्ज कामगार संघटनांनी आपल्या डोक्यावर घेतले आहे. कुणी कारखान्यावर आरोप करू नये, ही मागणी कामगार संघटना कशाच्या आधारे मांडत आहेत, असे अनेक प्रश्न कामगारांच्या भूमिकेमुळेही निर्माण झाले आहेत. सभासदांना आपल्या हक्काबद्दल बोलण्याचा अधिकार असताना कामगार त्यात सल्ला कसा देऊ शकतात, याची जाणीव कामगार संघटनेने ठेवलेली दिसत नाही. कारखान्याची बदनामी करू नका, असे आज कामगार संघटना म्हणते. मात्र, कामगारांनी २००३ साली कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या घरांवर मोर्चे काढले व अध्यक्ष, उपाध्यक्षांनी नंतर राजीनामे दिल्याने कारखाना बंद पडला, हाही इतिहास आहे. त्यामुळे अगस्ती जगला पाहिजे ही सर्वांची भूमिका योग्य असली तरी सगळे जण यात राजकारण करीत आहेत की काय, अशी शंका आहे.
.................
अगस्तीत सत्ताबदल झाला तेव्हा एक वर्ष कारखाना सुरळीत चालला. दुसऱ्या वर्षी कामगारांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढण्याची भाषा केल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तेव्हा कारखाना बंद पाडल्याचे खापर सुकाणू समितीवर फोडू नये. आर्थिक उधळपट्टीमुळे भविष्यात कारखाना बंद पडू नये म्हणून आमची जनजागृती सुरू आहे. ऊस उत्पादक सभासद झोपेचे सोंग घेत असतील तर लढा करायचा कुणासाठी, आर्थिक उधळपट्टीने कारखाना बंद पडल्यास कामगार दोष कुणाला देतील?
- शेतकरी नेते दशरथ सावंत