जिल्हा बँकेचे अध्यक्ष कोण? शेळके की मुरकुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:10+5:302021-03-06T04:20:10+5:30
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अचानक उदय शेळके व भानुदास मुरकुटे ही दोन नावे पुढे आली. ...

जिल्हा बँकेचे अध्यक्ष कोण? शेळके की मुरकुटे
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अचानक उदय शेळके व भानुदास मुरकुटे ही दोन नावे पुढे आली. पण, यापैकी कोण, याचा निर्णय शनिवारीच घेतला जाणार आहे. अर्थात याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याने अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव येते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी शनिवारी नवीन संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दुपारी १ वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात होणार आहे. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप या दोघांची नावे चर्चेत होती. अध्यक्ष निवडीच्या एक दिवसआधी शुक्रवारी वेगाने चक्रे फिरली व आणखी दोन नावे चर्चेत आली. यामध्ये एक पारनेरचे उदय शेळके, तर दुसरे नाव श्रीरामपूरचे भानुदास मुरकुटे यांचे आहे. बँकेच्या कारभाराला जो शिस्त लावेल तसेच विरोधकांबाबत रोखठोक भूमिका घेईल, असा निकष लावला गेला आहे. शेळके यांना महानगर बँकेच्या कारभाराचा अनुभव आहे. श्रेष्ठींना अपेक्षित असलेली कणखर भूमिका शेळके बँकेत घेतील, असे काहींची म्हणणे आहे. अध्यक्ष पदासाठी ज्या चार संचालकांची यादी आहे, त्यात यादीत शेळके यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. पण, अधिकाधिक संचालक बिनविरोध निवडून आणताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही राजकीय तडजोडी केल्या आहेत. त्यातून मुरकुटे यांचे नाव पुढे आले आहे. मात्र त्याला श्रेष्ठी किती महत्त्व देतात, यारच बरेच काही अवलंबून आहे. उपाध्यक्षपदासाठी संगमनेरचे माधवराव कानवडे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, महसूलमंत्री थोरात हे कुणाच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
.....
जि.प. अध्यक्षांच्या निवास्थानी मंत्र्यांची बैठक
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारणतंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांच्यासह संचालकांची बैठक नगरमध्ये होणार आहे. ही बैठक दुपारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या शासकीय निवास्थानी होणार आहे. या बैठकीत चर्चा होणार असून, त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...
भाजपमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अकोल्याचे पिचड, श्रीरामपूरचे मुरकुटे आणि कोपरगावचे कोल्हे कुटुंब जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोबत घेतले. त्यामुळे विखे गटाचा बुरूज ढासला असून, भाजपाचे किती संचालक राष्ट्रवादी-थोरात गटाच्या बैठकीला उपस्थित राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
....