शेवगाव शहराच्या वाट्याचे पाणी मुरते कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:21+5:302021-02-21T04:39:21+5:30
शेवगाव : शेवगाव-पाथर्डीसह ५४ गावे प्रादेशिक नळ योजनेतून मिळणारे पाणी शेवगाव शहराला बारा दिवसांनी पाणी मिळते. दूर असूनही पाथर्डी ...

शेवगाव शहराच्या वाट्याचे पाणी मुरते कुठे?
शेवगाव : शेवगाव-पाथर्डीसह ५४ गावे प्रादेशिक नळ योजनेतून मिळणारे पाणी शेवगाव शहराला बारा दिवसांनी पाणी मिळते. दूर असूनही पाथर्डी शहारातील नागरिकांना दर दोन दिवसांनी पाणी मिळते. त्यामुळे शेवगावकरांच्या हिस्साचे पाणी कुठे मुरते? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. हा मूलभूत प्रश्न प्रशासक देवदत्त केकाण सोडविणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पाणी योजना एकच. शहरांच्या लोकसंख्येतील अधिकृत आकडेवारी व सद्यपरिस्थितीमध्ये थोडीफार तफावत असताना शेवगावपासून तब्बल वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा वर्षभर नियमितपणे सुरळीत असतो. जायकवाडी धरणाच्या शेजारी असूनही पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी करावी लागणाऱ्या भटकंतीची सल शेवगाव शहरातील नागरिकांच्या मनात अनेक वर्षांपासून आहे. ‘धरण उशाला असूनही कोरड घशाला’ अशी स्थिती येथे आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. दुसरीकडे सुरळीत पाणीपुरवठ्यामुळे पाथर्डी शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २७ हजार, तर शेवगाव शहराची ३८ हजार ३७५ इतकी नोंदली गेली. पाथर्डीत सद्य:स्थितीत लोकसंख्या ३५ हजारांच्यापुढे असल्याचे सांगण्यात येते, तर शेवगावची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. पाथर्डीपेक्षा शेवगावची लोकसंख्या व नळ कनेक्शन जास्त असली तरी त्यांच्या वाट्याला जास्त पाणी मिळते.
----
पाथर्डीला सकाळी सरासरी ८ ते १० वाजेपर्यंत २७ ते २८ लाख लिटर पाणी पुरवठा होतो, तर शेवगावला २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो. त्यातून सरासरी ३८ ते ४० लाख लिटर नियमित पाणी दिले जाते. पाथर्डी पालिकेने पाणीपट्टी पूर्ण भरली असून, शेवगाव नगर परिषदकडे ग्रामपंचायत काळापासूनची बाकी येणे आहे.
-राहुल देशमुख,
पाणीपुरवठा, ठेकेदार
----
कोणत्या शहराला किती पाणी मिळते?
पाथर्डी : लोकसंख्या ३५ ते ३८ हजार. रोज मिळणारे पाणी : २७ ते २८ लाख लिटर. नळ कनेक्शन : ५००० पुढे. वाॅल : २१२
पाणी सोडणारे कर्मचारी : ६. तीन टाक्यांची साठवण क्षमता : १८.७५ लाख लिटर. दोन दिवसांनी ४० ते ४५ मिनिटे पाणीपुरवठा होतो.
शेवगाव :
लोकसंख्या ५० ते ५२ हजार. रोज मिळणारे पाणी : ३८ ते ४० लाख लिटर. नळ कनेक्शन : ७ हजार ४३३. वाॅल : ३१२
पाणी सोडणारे कर्मचारी : ११ दोन टाक्यांची साठवण क्षमता : १७.५० लाख लिटर. दहा ते बारा दिवसांनी ३० ते ३५ मिनिटे पाणीपुरवठा