नगरचे पालकमंत्री आहेत कुठे? भाजपचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 14:52 IST2020-05-29T14:51:08+5:302020-05-29T14:52:20+5:30
नगर जिल्हा हॉटस्पॉट जाहीर झालेला असताना पालकमंत्री गेल्या दोन महिन्यात नगर जिल्ह्यात कुठेही फिरकले नाहीत? असा आरोप भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

नगरचे पालकमंत्री आहेत कुठे? भाजपचा सवाल
अहमदनगर : नगर जिल्हा हॉटस्पॉट जाहीर झालेला असताना पालकमंत्री गेल्या दोन महिन्यात नगर जिल्ह्यात कुठेही फिरकले नाहीत? असा आरोप भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
केंद्र सरकारच्या एक वर्षातील विविध योजनांबाबत माहिती देण्यासाठी नगरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अरुण मुंडे बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे, माजीमंत्री राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांमध्ये अत्यंत चांगले काम केलेले आहे. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गेल्या दोन महिन्यात प्रशासनाकडून कुठलाही आढावा घेतला नाही. भाजपचे माजीमंत्री, आमदार यांनी मोठ्या प्रमाणात संकटकाळात जनतेला मदत केली. परंतु सत्ताधारी पक्षाच्या तिन्ही मंत्र्यांकडून तशी मदत झाली नाही. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार आहेत. तीन मंत्री आहेत. परंतु त्याचा उपयोग जिल्ह्याला झाला नाही, असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला.