अर्सेनिक गोळ्या गेल्या कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:39+5:302021-04-02T04:21:39+5:30
अहमदनगर : कोरोना संसर्गाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या हेतूने जिल्हा परिषदेकडून ग्रामस्थांना वाटण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या चक्क जिल्हा परिषद ...

अर्सेनिक गोळ्या गेल्या कोठे?
अहमदनगर : कोरोना संसर्गाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या हेतूने जिल्हा परिषदेकडून ग्रामस्थांना वाटण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या चक्क जिल्हा परिषद सदस्यांच्याच घरी गेल्या नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत काही सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे विचारणा केली. दरम्यान, यामुळे २ कोटी ४८ लाख रुपये खर्चून वाटप केलेल्या गोळ्या खरंच नागरिकांपर्यंत गेल्या का, असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यात ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचा डोस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामीण भागातील ३८ लाख ४१ हजार लोकांना या गोळ्या वितरित करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले.
डिसेंबर २०२० मध्ये पुण्यातील एका ठेकेदारामार्फत या गोळ्या जिल्हा परिषदेकडून प्रत्येक तालुक्यात व तेथून ग्रामपंचायत स्तरावर वाटून ग्रामस्थपर्यंत पोहोच करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डिसेंबर २०२० पासून या गोळ्यांचे वाटप सुरू झाले. परंतु अद्यापही अनेक गावांमध्ये या गोळ्या पोहोचल्या नसल्याचे आता समोर येत आहे.
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या घरी गोळ्या आल्या नसल्याने त्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली. त्यानंतर अंगणवाडी सेविकामार्फत त्यांच्या घरी गोळ्या पोहोचवण्यात आल्या. हर्षदा काकडे यांनीही अद्यापि या गोळ्या आपल्या घरी आल्या नसल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या गोळ्यांबाबत प्रश्न उपस्थित करून या गोळ्या वाटप झाल्या का? असा प्रश्न प्रशासनाला केला होता. सदस्य शरद नवले यांनीही या गोळ्या वाटपाचा हिशेब प्रशासनाकडे पत्र पाठवून मागितला. मात्र त्या पत्राला अद्याप उत्तर आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भाजपचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी गोळ्या वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या गटात देवठान या गावचा ग्रामसेवक गोळ्या उशिरा वाटप केल्याच्या कारणातून निलंबित झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.