कोतूळ पुलाचे घोडे अडले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:48+5:302021-01-03T04:21:48+5:30
कोतूळ : गतवर्षी कोतूळ पुलासाठी ग्रामस्थांनी सलग चौदा दिवस बैठा सत्याग्रह करत सरकार व नोकरशाहीला वठणीवर आणत पुलाच्या कामाची ...

कोतूळ पुलाचे घोडे अडले कुठे?
कोतूळ : गतवर्षी कोतूळ पुलासाठी ग्रामस्थांनी सलग चौदा दिवस बैठा सत्याग्रह करत सरकार व नोकरशाहीला वठणीवर आणत पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर आणली. मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप पुलाला एक दगडही लागला नसल्याने पुलाचे घोडे कोठे अडले हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१४ ला पिंपळगाव खांड धरण पूर्ण झाले. त्यात कोतूळ पूल पाण्याखाली गेला. धरण होताना पुलाची बुडीत पुलाचे मूल्यांकन आले असते तर धरणच झाले नसते म्हणून धरणाच्या आतील व खालील लाभधारक गावांनी आधी धरण, मग पूल ही भूमिका घेतली.
२०१५ पासून पूल लवकर व्हावा म्हणून कोतूळातील सात आठ तरूणांनी पूल समिती बनवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन, बाळासाहेब मुरकुटे, मधुकर पिचड, शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाठपुरावा करत पुलासाठी २०१९ मध्ये २० कोटी पदरात पाडले. यासाठी कोतूळकरांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दोन तास गावात कोंडून ठेवले होते.
२०२० पर्यंत कामाची सुरूवात होणे अपेक्षित होते. मात्र कामाची ‘वर्क ऑर्डर’ मिळत नसल्याने गतवर्षी २ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी असा चौदा दिवस दहा गावातील जनतेने मुक्काम सत्याग्रह केला. शेवटी जलसंपदाचे अधिकारी व आमदार डाॅ. किरण लहामटे, डाॅ. अजित नवले, साथी विनय सावंत यांनी सरकार, अधिकारी आंदोलकांत मध्यस्थी करीत पंधरा दिवसात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आश्वासन गावासमक्ष घेतले.
...
कोरोनामुळे काम लांबले?
कोरोना पार्श्वभूमीवर काम सुरू झाले नाही असे अधिकारी सांगतात. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील डांबरीकरणे, कालवे, कोल्हार घोटी राज्यमार्गावर तसेच ग्रामपंचायत स्तरावरील ठेकेदारांची कामे व लोकप्रतिनिधींची उदघाटने सुरू आहेत. मग कोतूळ पुलाचे घोडे कोठे आडले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
..
फोटो-०२कोतूळ पूल
..
ओळी-अकोले तालुक्यातील कोतूळ येथील पुलावरुन पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होते.
....