१२८ महाविद्यालये कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:02+5:302021-07-15T04:16:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : गेल्या दीड वर्षापासून वैश्विक कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये बंद ...

१२८ महाविद्यालये कधी सुरू होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : गेल्या दीड वर्षापासून वैश्विक कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे सुरू आहेत. सद्य:स्थितीत काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा १५ जुलैपासून सुरू करण्यासाठी जिल्ह्यात हालचाली सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील १२८ महाविद्यालये सुरू करण्याविषयी कोणत्याच प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे नेमके महाविद्यालय कधी सुरू होणार याच प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.
शासनाने कोरोनामुक्त गावात एक समिती स्थापन करून नियम व अटी घालून देत शाळा सुरू करण्यासंदर्भात परवानगी दिली आहे. त्यानुसार गाव स्तरावर या समितीचे कामकाजदेखील सुरू आहे. काही दिवसांत गावातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होतील. याउलट महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सध्यातरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईनच शिक्षणाचे धडे सुरू आहे.
.................
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - १२८
विज्ञान महाविद्यालय - ५६
वाणिज्य महाविद्यालय - ४०
कला महाविद्यालय - ३२
.............
आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच बारावीचा निकाल लागलेला नाही. तसेच महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
- डॉ. बी. एस. यादव, प्राचार्य, सोमैया महाविद्यालय, कोपरगाव
................
महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून कोणत्याही सूचना आल्या नाही. तसेच सध्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे. महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात काही सूचना आल्याच तर महाविद्यालयातील सर्व वर्ग खोल्या सॅनिटाईज केलेल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील सूचना आल्याच तर आमची तयारी झालॆली आहे.
- डॉ. शंकरराव थोपटे, प्राचार्य, एस. एस. जी. एम, महाविद्यालय, कोपरगाव
..............
सध्या सर्वत्र परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही.
- एन. आर. सोमवंशी, संचालक, विद्यापीठ उपकेंद्र, अहमदनगर
.............
ऑफलाईन शिक्षण हे समजण्यास सोपे आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असून, ते समजणे अवघड आहे. त्यामुळे महाविद्यालय सुरू व्हावे अशी इच्छा आहे.
- पंकज वीर, विद्यार्थी
.........