ग्रामस्थांनी पाठलाग करताच टेम्पोतून पडल्या गहू, तांदळाच्या गोणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:39+5:302021-07-02T04:15:39+5:30
कर्जत : लोणी मसदपूर (ता. कर्जत) येथील स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा ग्रामस्थांनी पाठलाग ...

ग्रामस्थांनी पाठलाग करताच टेम्पोतून पडल्या गहू, तांदळाच्या गोणी
कर्जत : लोणी मसदपूर (ता. कर्जत) येथील स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा ग्रामस्थांनी पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर त्या टेम्पोतील गहू, तांदळाच्या काही गोणी खाली पडल्या. मात्र, चालक टेम्पो घेऊन पसार झाला.
टेम्पोतून पडलेल्या गहू, तांदळाच्या गोण्यांचा पुरवठा विभागाने पंचनामा केला असून, तो अहवाल तहसील कार्यालयाला दिला आहे. संबंधीत स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोणी मसदपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार बुधवारी दुपारी एका खासगी टेम्पोत गहू व तांदळाच्या गोणी भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. लोणी मसदपूरकडून तो चालक टेम्पो घेऊन कोरेगावच्या रस्त्याने निघाला. गावातील ग्रामस्थ व युवकांनी या टेम्पोचा पाठलाग केला. हा प्रकार टेम्पो चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने टेम्पोचा वेग वाढविला. दरम्यान, गव्हाच्या ६ आणि तांदळाच्या २ गोणी रस्त्यावर पडल्या. टेम्पोतील इतर धान्य घेऊन चालक पसार झाला. यानंतर ग्रामस्थांनी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पुरवठा निरीक्षक श्रीरंग अनारसे व पोलीस कर्मचारी यांच्या समक्ष टेम्पोमधून पडलेल्या ८ गोणींचा पंचनामा केला. या गोणी जप्त करून पुरवठा शाखेच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
येथील रेशन दुकानदार नियमितपणे गरजूंना धान्याचे वाटप करत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. यामुळे या दुकानदाराचा परवाना रद्द करावा व काळ्या बाजारात या प्रकरणाचा तपास करून न्याय द्यावा, अशी मागणी लोणी मसदपूर येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सचिन कांबळे, सचिन अडागळे, अक्षय कटारे, नवनाथ घायतडक, पिंटू अटक, राहुल केंदळे, नीलेश बागल, प्रसाद भोसले आदींच्या सह्या आहेत.
----
लोणी मसदपूर येथील स्वस्त धान्य दुकानाच्या रस्त्यावर पडलेल्या गोण्यांचा ग्रामस्थ व पोलीस यांच्या समक्ष पंचनामा केला. याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्यात आला आहे.
-श्रीरंग अनारसे,
पुरवठा निरीक्षक, कर्जत
----
०१लोणी मसदपूर
लोणी मसदपूर - कोरेगाव रस्त्यावर टेम्पोतून पडलेल्या गहू, तांदळाच्या गोणी उचलताना स्वस्त धान्य दुकानदार.