कसला गोडवा, कसला सत्कार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:45+5:302021-03-10T04:21:45+5:30
श्रीगोंदा : जगाला उसातून साखरेचा गोडवा देणारा ऊस तोडणाऱ्या महिला मजुरांना कसला गोडवा, कसला सत्कार असे म्हणण्याची वेळ महिला ...

कसला गोडवा, कसला सत्कार...
श्रीगोंदा : जगाला उसातून साखरेचा गोडवा देणारा ऊस तोडणाऱ्या महिला मजुरांना कसला गोडवा, कसला सत्कार असे म्हणण्याची वेळ महिला दिनी आली आहे. ८ मार्चला उसाच्या फडातच दिवसभर ऊस तोडून या महिलांचा महिला दिन साजरा झाला. आम्हाला कसला महिला दिन आहे ही माहीतच नाही, असा सवालही या महिलांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा तालुक्यात पाच-सहा साखर कारखान्यांचे सुमारे आठ हजार ऊसतोडणी मजूर ऊसतोडणी करीत आहेत. यामध्ये ५० टक्के महिला आहेत. उसाच्या माहेरघरात ऊसतोडणीचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. शिवाजीराव नागवडे साखर कारखाना, कुंडलिकराव जगताप साखर कारखाना, साजन शुगर, अंबालिका शुगर, दौंड शुगर, बारामती अॅग्रो या साखर कारखान्यांचे मजूर जिवाची पर्वा न करता ऊसतोडणी करीत आहेत.
बदलत्या युगात ऊसतोडणी महिलांचे कष्ट मात्र कमी झाले झालेले नाहीत. त्या शरीराच्या कार्यक्षमतेपेक्षा जादा कष्ट करीत आहेत. या महिलांची आरोग्य तपासणी कधीच वेळेवर होत नाही. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असते. त्या मासिक पाळीच्या वेदना, अन्य आजाराने पीडित असतात. मुलांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. पण ऊसतोडणीच्या महासंग्रामात त्या कुणाला आपले दु:ख सांगणार, अशी परिस्थिती आहे. ८ मार्चला जागतिक महिला दिनाचा मोठा गवगवा मोठा झाला. ठिकठिकाणी महिलांचा मानसन्मान करण्यात आला; पण जागतिक महिला दिनाचा गोडवा उसाच्या फडात पोहोचला नाही. महिलादिनी सर्व ऊसतोडणी करणाऱ्या महिला आपल्या लहान मुलांना घेऊन उसाच्या फडात दाखल झाल्या. नेहमीप्रमाणे ऊसतोडणीचे काम केले.
....
मुले उसाच्या फडात
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ऊसतोडणी मजुरांची मुलेही मोठ्या प्रमाणावर उसाच्या फडात दिसत आहेत. त्यांना कसला मोबाईल फोन अन् कसले ऑनलाईन शिक्षण? त्यामुळे मुलांमध्ये आपले भविष्य पाहणाऱ्या माता कमालीच्या अस्वस्थ दिसत आहेत.
....
आम्हाला महिला दिनच माहीत नाही....!
जग बदलतंय; महिलांना मानसन्मान मिळू लागला आहे. महिला दिन साजरा केला जातो; पण आम्हाला हा दिन माहीतच झाला नाही. ऊसतोडणी सोडून आमच्या नशिबी दुसरे काय आहे?
- सुनीता नारायण चव्हाण, लिंबायती तांडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद