मुळा टेलच्या भागातील विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:51+5:302021-06-19T04:14:51+5:30
तिसगाव : मेअखेरच्या सप्ताहात वळवाच्या पावसाने पाठ फिरविली. त्यानंतर मृग, रोहिणी नक्षत्रेही कोरडीच गेली. त्यामुळे मुळा पाटचारीच्या टेलच्या भागातील ...

मुळा टेलच्या भागातील विहिरींनी गाठला तळ
तिसगाव : मेअखेरच्या सप्ताहात वळवाच्या पावसाने पाठ फिरविली. त्यानंतर मृग, रोहिणी नक्षत्रेही कोरडीच गेली. त्यामुळे मुळा पाटचारीच्या टेलच्या भागातील सुसरे, साकेगाव, चितळी, पाडळी, ढवळेवाडी, काळेगाव परिसरातील विहिरींनी अक्षरशः तळ गाठला आहे. त्यामुळे ऊस, मूग, भुईमूग या उन्हाळी पिकांसह कडवळ, घास, मका ही चारापिके सुकू लागली आहेत. त्यामुळे आवर्तन कालावधी वाढविण्याची मागणी या भागातील सरपंचांसह शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरोनाबाबतचे लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ग्रामसभांमधून हा टंचाईचा विषय गांभीर्याने चर्चिला जात आहे. या गावांमधील सरपंच वैशाली कंठाळी, सुरेखा गर्जे, छायाताई सातपुते, बाबासाहेब चितळे आदींनी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले, तसेच ग्रामसभांचे ठरावही सादर केले.
पाथर्डीच्या पश्चिम भागातील मुळा पाटचारीचे सध्या उन्हाळी आवर्तन अखेरच्या टप्प्यात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अनुमती घ्यावी लागेल, त्यानंतर आवर्तन वाढवता येईल, असे आश्वासन अभियंता सायली पाटील यांनी दिले.
ऊस उत्पादन घेण्यात अग्रणी असलेली ही गावे आहेत. नवीन आडसाली ऊस लागवडीही यामुळे थांबल्या आहेत. पाटपाण्याचे वाढीव आवर्तन मिळावे, अशी मागणी विविध गावांच्या सरपंचांसह बाजार समिती संचालिका सीमा चितळे यांनी केली आहे.