राजदरबारी त्रिकुटाचेच वजन

By Admin | Updated: June 21, 2014 00:45 IST2014-06-20T23:25:51+5:302014-06-21T00:45:35+5:30

मनसेत फेरबदल : डफळ, लोढा, झिंजे आणि जाधवांना पदे बहाल

The weight of the Tripura ruler | राजदरबारी त्रिकुटाचेच वजन

राजदरबारी त्रिकुटाचेच वजन

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील त्रिकुटाचेच राज दरबारी वजन असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे़ मनसेच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व करणारे शहर व जिल्ह्याच्या दोन्ही माजी अध्यक्षांना नारळ देऊन जिल्हाध्यक्षपदी सचिन डफळ, उपजिल्हाध्यक्ष संजय झिंजे, सचिवपदी वसंत लोढा आणि शहराध्यक्षपदी त्यांच्याच मर्जीतील गिरिश जाधव यांची निवड शुक्रवारी करण्यात आली़
विधानसभा निवडणुकीत अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे़ राज्यात राज लाट उभी करून विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकविण्याचा निर्धार ठाकरे यांनी केला आहे़ याचाच एक भाग म्हणून नगरच्या कार्यकारणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत़ स्वत: अध्यक्ष ठाकरे यांनी नवीन कार्यकारणी निवडली असून, त्यांची स्वाक्षरी असले नियुक्ती पत्र पत्रकार परिषदेत डफळ यांनी वाचले़
पूर्वीचे जिल्हा संघटक हे पद पक्षाने गोठविले असून, जिल्हासंघटकपदी डफळ कार्यरत होते़ त्यांची निवड नवीन कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली असल्याचे लोढा यांनी यावेळी जाहीर केले़ याशिवाय शहराध्यक्षपदावरून सतीश मैड याची हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांच्या जागी गिरीश जाधव यांची निवड करण्यात आली आहे़ जाधव यांची निवड दुसऱ्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे़ नवीन कार्यकारणीत ठाकरे यांनी झिंजे यांच्यावर उपजिल्हाध्यक्षपदाची तर लोढा यांची सचिवपदी वर्णी लावली आहे़ (प्रतिनिधी)
सहा जिल्हाध्यक्ष
नगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत़ दोन मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष अशी निवड करण्यात आली आहे़ त्यानुसार नगर व पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी या निवडी करण्यात आल्या आहेत़ जिल्हाध्यक्षपदी सचिन डफळ, उपजिल्हाध्यक्षपदी झिंजे, जिल्हा सचिवपदी लोढा यांची तर शहराध्यक्ष पदी जाधव यांची निवड करण्यात आली आहे़
पक्षविरोधी कारवायांना माफी नाही
यापूर्वी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई होत नव्हती़ परंतु यापुढे तसे होणार नाही़ स्वत: राज ठाकरे यांनीच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे यापुढे पक्षविरोधी कारवाया केल्यास खपून घेतले जाणार नाही, असे यावेळी डफळ यांनी सांगितले़
विधानसभेसाठी चाचपणी
विधानसभेसाठी आपण इच्छुक नाही, असे डफळ यांनी जाहरी केले़ उपजिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी त्यांच्याच सुरात सूर मिसळला़ मात्र लोढा यांनी पक्षाने आदेश दिल्यास उमेदवारी करू, असे सांगून इच्छा व्यक्त केली आहे़ त्यामुळे विधानसभेची उमेदवारी कार्यकारणीत स्थान न मिळालेल्यांना मिळणार की लोढा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, ते पाहावे लागेल़
मनसेत संजय झिंजे व वसंत लोढा, या जोडीने मनसेत प्रवेश केला़ परंतु त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते़ पद नसले तरी लोढा व झिंजे यांनी पक्षात वजन निर्माण केले़ त्यामुळेच लोढा यांच्या पत्नीला महापालिका निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळाली़ परंतु लोढा यांच्या प्रभागातून मनसेचे डागवाले निवडून आले आणि स्थायी समितीचे सभापती झाले़ मनसेने राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्ता स्थापनेत साथ दिली़ परंतु राष्ट्रवादीशी सर्वात आधी चर्चा सुरू केल्याने कैलास गिरवले यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली़ परिणामी मनसेत दोन गट पडले़ मनसेत डागवाले, मैड, गिरवले, भोसले यांचा एक गट, तर डफळ, लोढा आणि झिंजे यांचा एक, असे चित्र निर्माण झाले़ नवीन कार्यकारणीत स्थान मिळविण्यासाठी दोन्ही गटांकडून ताकद लावण्यात आली़ परंतु ठाकरे यांच्या दरबारात सचिन डफळ, वसंत लोढा आणि संजय झिंजे त्रिकुटाचे वजन असल्याचे या नियुक्तीने उघड झाले आहे़

Web Title: The weight of the Tripura ruler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.