लंडनच्या वऱ्हाडात सखी झाल्या मंत्रमुग्ध
By Admin | Updated: July 30, 2014 00:45 IST2014-07-29T23:32:23+5:302014-07-30T00:45:53+5:30
अहमदनगर : विश्वविक्रम करणारे रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, लेखक प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’च्या एकपात्री प्रयोगाने रसिकमनावर अधिराज्य गाजविले होते.
लंडनच्या वऱ्हाडात सखी झाल्या मंत्रमुग्ध
अहमदनगर : विश्वविक्रम करणारे रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, लेखक प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’च्या एकपात्री प्रयोगाने रसिकमनावर अधिराज्य गाजविले होते. त्यांचाच वसा पुढे नेत सिने अभिनेता संदीप पाठक यांनीही हे लंडनचे वऱ्हाड अहमदनगर, संगमनेर व श्रीगोंदा येथील मंचावर हुबेहूब साकारले.
लोकमत सखी मंचच्या वतीने ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर येथील सहकार सभागृहात हा कार्यक्रम सखींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. साईदिप ग्रुप प्रस्तुत असोसिएट स्पॉन्सर्स हॉटेल यश ग्रॅण्ड, आशा भेळ, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान भोसले आखाडा, शांती चौक मित्रमंडळ राहुरी फॅक्टरी या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात पात्र परिचयापासून नाट्य प्रयोगाच्या शेवटच्या संवादापर्यंत संदीप यांनी साकारलेले अभिनयविश्व सखी प्रेक्षकांना खळखळून हसविणारे होते. बप्पा, बबन्या, काशिनाथ, जॉन राव आणि घरातील महिला मंडळींचे संवाद ताकदीने संदीप पाठक यांनी सादर करुन सखी प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली.
डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांच्या लेखणीतील जादू अभिनयात उतरविण्याचा पुरेपूर प्रयत्न संदीप यांनी केला. काशिनाथचे लग्न अन् तेही लंडनला, त्यासाठी गावाकडचे निघालेले वऱ्हाड ही तारांबळ विनोदी अन् तितक्याच धीरगंभीर संवादासह सादर झाली. गावातील अन् तेही एकत्र कुटुंबातील हे कथानक अवतीभवतीचे वाटावे असे आहे. रडणे, हसणे, रागावणे, लहान मुलांचे लडीवाळपणे बोलणे, महिलांची कुजबुज आणि भांडण, घरातील कारभाऱ्याचा रुबाब या साऱ्याच छटा एकाच मंचावर संदीप पाठक यांनी दिलखेचकपणे सादर केल्या.
(प्रतिनिधी)
१संगमनेर : येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी व्यासपीठावर लोकमतचे आश्विन मुथा, संदीप पाठक, संदीप सोनार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सूर्यवंशी यांनी केले.
२श्रीगोंदा : लीलावती बन्सीलाल नाहाटा मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व जागर युवती प्रतिष्ठान प्रस्तुत बालाजी मंगल कार्यालयात सखींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा प्रयोग पार पडला. सखींनी संदीप पाठक यांच्या अभिनयाला दाद दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी व्यासपीठावर मनिषा नाहाटा, रुपाली नाहाटा, आशा खोसे, अंजली बगाडे, अनुपमा बगाडे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवयानी खेंडके, मंदाकिनी खेंडके, पूनम फिरोदिया, जयश्री औटी, विद्या गुंदेचा आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन रोहिणी काकडे यांनी केले.