आम्ही कष्ट करू... मुला-बाळांचं तेवढं बघा !

By Admin | Updated: April 15, 2016 00:29 IST2016-04-14T23:55:36+5:302016-04-15T00:29:11+5:30

अहमदनगर : ‘नापिकीमुळे ताण आला आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आमचा विचार केला नाही. आमची कष्ट करायची तयारी आहे,

We will work ... see children and babies! | आम्ही कष्ट करू... मुला-बाळांचं तेवढं बघा !

आम्ही कष्ट करू... मुला-बाळांचं तेवढं बघा !

अहमदनगर : ‘नापिकीमुळे ताण आला आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आमचा विचार केला नाही. आमची कष्ट करायची तयारी आहे, मात्र मुला-बाळाचं कसं होणार? शिकलेल्या आहोत, नोकरी करायची पात्रता आहे, मात्र सरकार दरबारी लाखो रुपये मागितले गेले. त्यामुळेच आमचा संसार उघड्यावर आला. ज्यांना ताण येतोय, त्यांनी आधी मुलाबाळांचे भान ठेवा, आत्महत्या कशाला करता,’ असे आवाहन करीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी महिलांच्या अश्रुंचा बांध फुटला. ‘रडायचं नाही, आता लढायचं’ असा धीर देत नानांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
‘नाम’ संस्थेतर्फे गुरुवारी नगर जिल्ह्यातील ११२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. नगर येथे झालेल्या या कार्यक्रमास अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, बीड जिल्ह्यातील उद्योजक केशव आघाव, राजाभाऊ शेळके, गोगलगावचे सरपंच व कार्यक्रमाचे आयोजक योगेश म्हस्के उपस्थित होते. पुष्पहार, स्वागत, प्रास्ताविक अशा कार्यक्रमांना फाटा देत थेट कार्यक्रम सुरू झाला. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी थेट महिलांच्या हाती मदतीचे धनादेश दिले. मदत मिळाल्यानंतर महिलांनी आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली.
ममदापूर (ता. राहाता) येथील प्रीती सतीश केसकर म्हणाल्या, मालक कृषी विद्यापीठात कंत्राटी पद्धतीवर काम करीत होते. दुसरे काम शोधण्याआधीच त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. माझे एम.ए. डी.एड. शिक्षण झाले आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी डोनेशन मागितले जात आहे. मला नोकरीची गरज आहे. त्यावेळी नानांनी तिला नोकरी देण्याचे सांगितले. मला डोनेशन नको, मात्र नारळ आणि पेढा तेवढा द्या, असे सांगताच प्रीती यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
आत्महत्या केलेल्या रमेश धनवटे यांच्या आई लक्ष्मीबाई धनवटे (रा.निमगाव जाळी, ता. संगमनेर) यांच्या अश्रुंचा बांध फुटला. त्यांना रडणे आवरले नाही. एक नातू, तीन नातींना वाढवायचं कसं? मजुरी केली तर दीडशे ते दोनशे रुपये रोज मिळतात. आम्ही कष्ट करू, मात्र मुलाचं कसं होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. नानांनी तिन्ही मुलांना बीडच्या शांतीवनमध्ये शिक्षणासाठी व्यवस्था केल्याचे सांगितले. आम्ही सगळी तुझीच पोरं असल्याचे नाना म्हणताच, लक्ष्मीबाई यांना भरून आले.
मंदा भाऊसाहेब ढेरंगे (रा. आंबीदुमाला, संगमनेर) म्हणाल्या,आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी-मुलांचा विचार त्यांनी कसा केला नाही. थोड्याशा तणावामुळे आमचा संसार उघड्यावर आणला. आत्महत्या करण्याचा ज्यांनी विचार केला असेल त्यांनी मुलांचे भान ठेवा. आत्महत्येचा विचार सोडून द्या. सातवेळा पोलीस भरतीसाठी गेले. पात्र ठरल्यानंतर पैसे मागितले. एम.ए. डी.एड. असूनही नोकरी नाही. डबे देवून संसार सांभाळला. आता शेतात कांद्याची लागवड केली आहे, त्याला भाव मिळेल की नाही ते सांगता येत नाही. पुण्यात आठ हजार रुपयांच्या नोकऱ्या काय परवडणार? असे सांगत मंदा यांनी हंबरडा फोडला.
या कार्यक्रमात सर्पमित्र, पत्रकार , विद्यार्थिनी यांनी मदतीचे धनादेश नानांच्या हाती सुपूर्द केले.
मकरंद अनासपुरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र वगळता मदतीची मोहीम पूर्ण झाली आहे. रस्त्याने महाराष्ट्र फिरलो, त्यावेळी नामची चळवळ घट्ट झाली. शेळीवाटप, बाराशे शिलाई यंत्र वाटप केले. महिलांना प्रशिक्षण दिले. दोनशे मुलांच्या शिक्षणाची सोय केली. पाण्यासाठी तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण केले. शहरवासियांनी मदतीचा ओघ सुरू ठेवला. भारत-इंडिया यामध्ये समन्वय साधला. आणखी व्याप्ती वाढते आहे. परदेशातून मदतीची विचारणा होतेय.
महापालिकेतील नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन ‘नाम’ला दिल्याचे पत्र शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी नाना पाटेकर यांना कार्यक्रमात दिले. पत्रकार परिषद सुरू असताना मानधन देण्याबाबतचे तसेच दुसरे पत्र महापौर अभिषेक कळमकर यांनी नाना पाटेकर यांना सुपूर्द केले. यावेळी नगरला एवढे तरुण महापौर कसे काय? याचे नानांना आश्चर्य वाटले. तुमचा व्यवसाय काय आहे? तुमचे उत्पन्न किती? असे प्रश्न नानांनी उपस्थित करताच महापौरांची तारांबळ उडाली. ‘पत्रकारांसमोर कसे सांगू? मी विद्यार्थीच आहे, पण थेट राजकारणात आलो आणि महापौर झालो. त्यामुळे माझे स्वत:चे काहीच उत्पन्न नाही’. महापौरांच्या उत्तरावर नानांनी थेट महापौरांच्या खिशात हात घालत एवढा महागडा पेन कसा वापरता?, असा सवाल केला. त्यावर महापौर म्हणाले, माझा हॉटेल व्यवसाय आहे. तोही फार चालत नाही. वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते. महापौरांच्या स्पष्टीकरणानंतर एकच हशा पिकला. यावेळी नाना म्हणाले, तुम्ही किती कमावता, यापेक्षा तुमच्या उत्पन्नाचा काही अंश समाजाला द्या. नगरचा विकास चांगला करा, एवढीच अपेक्षा आहे. यानंतर महापौरांचा चेहरा खुलला.

Web Title: We will work ... see children and babies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.