अहमदनगर : आम्ही कोणत्याही अामिषाला बळी न पडल्याने निघोज (ता. पारनेर) ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीच्या दोन दिवस अगोदरच आमचे अपहरण झाले होते, असा जबाब येथील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर भागाजी लाळगे, गणेश दत्तू कवाद यांनी खेड (जि. पुणे) येथील पोलीस ठाण्यात दिला आहे.
या प्रकरणी विठ्ठल भाऊसाहेब कवाद यांनी दिगंबर लाळगे, गणेश कवाद यांचे अपहरण झाल्याची फिर्याद खेड पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून सचिन मच्छींद्र वराळ, मंगेश सखाराम वराळ, सुनील मच्छींद्र वराळ, नीलेश राजू घोडे, अजय संयज वराळ, राहुल भाऊसाहेब वराळ, सुभाष आनंदा वराळ, आकाश विजय वराळ, धोंडीभाऊ जाधव आदींसह १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील ग्रा. पं. सदस्य सचिन वराळ, मंगेश वराळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी खेड न्यायालयात धाव घेतली आहे.
ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, गणेश कवाद यांनी खेड पोलीस ठाण्यात जबाब दिला आहे. पॅनल प्रमुख ठकाराम बाळा लंके व निवडून आलेल्या सदस्यांबरोबर देवदर्शनासाठी गेलो होतो. सरपंचपद निवडणुकीच्या अगोदर ७ फेब्रुवारीला पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटाच्या वर एका खानावळीत आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. त्यावेळी काही वाहनांमधून २५ ते ३० लोक उतरले. नीलेश राजू घोडे, राहुल भाऊसाहेब वराळ, धोंडीभाऊ महादू जाधव, अजय संजय वराळ, सुभाष आनंदा वराळ, स्वप्निल भाऊसाहेब दुनगुले (सर्व रा. निघोज, ता. पारनेर) हेही त्यामध्ये होते. त्यांनी काही कळायच्या आतच आम्हाला एका चारचाकी वाहनात बळजबरीने उचलून बसविले. त्यावेळी तेथेच सचिन मच्छींद्र वराळ, रंगनाथ किसनराव वराळ, मंगेश सखाराम वराळ उभे होते. विना क्रमांकाच्या वाहनात बसवून आम्हाला आळेफाटा-कल्याण रस्त्यावर नेण्यात आले. त्यानंतर इतर ठिकाणी फिरविण्यात आले. ९ फेब्रुवारीच्या दिवशी आम्ही अपहरणकर्त्यांना सरपंचपद निवडणुकीसाठी जाऊ द्या. लोकशाहीने दिलेला मूलभूत मतदानाचा हक्क आम्हाला बजावू द्या, अशी विनंती केली. मात्र त्यांनी दाद दिली नाही, असे लाळगे व कवाद यांनी जबाबात म्हटले आहे. आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही म्हणून आमचे अपहरण केले गेले, असेही त्यांनी म्हटले आहे.