आम्हाला सरकारचा एक रुपयाही नको; गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन, जतन होणे गरजेचे- संभाजीराजे
By शेखर पानसरे | Updated: November 17, 2022 16:45 IST2022-11-17T16:45:24+5:302022-11-17T16:45:40+5:30
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी ( दि.१७) संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आम्हाला सरकारचा एक रुपयाही नको; गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन, जतन होणे गरजेचे- संभाजीराजे
संगमनेर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे खऱ्या अर्थाने जिवंत स्मारक आहेत. हे जीवित ठेवायचे असेल तर गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन होणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे रायगड किल्ल्याचे संवर्धन, जतन होते आहे. ते रायगड मॉडेल आपण बाकीच्या किल्ल्यांचे का करू शकत नाही? सरकारला काही अडचण असेल तर आमची फोर्ट फेडरेशन ही संस्था स्थापन झाली आहे. त्या माध्यमातून आम्ही गड, किल्ल्यांचे संवर्धन करू. आम्हाला सरकारचा एक रुपयाही नको. असे संभाजीराजे छत्रपती भोसले म्हणाले.
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी ( दि.१७) संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व सहकारी संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे, प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे, व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका डॉ. संज्योत वैद्य, पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे आदी यावेळी उपस्थित होते.