वांबोरी चारीचे पाणी लोहसरपर्यंत पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 16:15 IST2019-09-06T16:14:34+5:302019-09-06T16:15:33+5:30
‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वांबोरी चारीचे पाणी लोहसरपर्यंत पोहोचले
करंजी : वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना मिळावे यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी व शेतक-यांनी वेळवेळी आंदोलने केली. ‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सलग दोन वषार्पासून दुष्काळाशी सामना करता-करता या भागातील शेतक-यांचे हालहाल झाले. संत्रा, मोसंबी, डाळिंबाच्या जपलेल्या बागा या भागातील शेतक-यांच्या डोळ्यादेखत जळून गेल्या. दावणीची दुभती जनावरे सहा महिन्यापासू्न छावणीत गेली. या भागातील करंजी परिसरातील दगडवाडी, भोसे, वैजू बाभुळगाव, लोहसर, खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कौडगावसह अनेक गावातील विहिरी, बोअरवेल आटून गेले. पिण्याच्या पाण्याची पावसाळ्यात तीव्र टंचाई जाणवत असून अनेक गावात टँकर चालू आहेत. या दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून मुळा धरणातून वांबोरी चारी योजना करण्यात आली. ही योजना पूर्ण होवून दहा वर्ष झाली तरी योजनेचे पाणी कधी या भागाला मिळाले नाही.
मागच्या वषीर्ही या भागात पाऊस झाला नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी या भागाला वांबोरी चारीचे पाणी सोडावे म्हणून या भागातील नागरिकांनीतीव्र आंदोलने केली. ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. मात्र पाणी चोरी, फूट तूट, अपूर्ण काम यामुळे या भागातील मढी, घाटसिरसच्या पुढे पाणी गेले नाही. यावर्षी पुन्हा या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने वांबोरी चारीचे आंदोलन या भागात सुरु झाले. त्यामुळे प्रशासनाने वांबोरी चारीला पाणी सोडले. तालुक्यातील लोहसर गावापर्यंत पोहोचले आहे.
वांबोरी चारीचे पाणी तालुक्यातील लोहसर गावापर्यंत पूर्ण दाबाने आले आहे. या भागातील नागरिकांच्या लढ्यामुळे व ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे चारीला पाणी आले, असे वांबोरी चारी समितीचे समन्वयक संतोष आठरे यांनी सांगितले.
वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे १०२ पाझर तलाव भरण्याची योजना आहे. पूर्ण क्षमतेने योजना चालू राहिल्यास या भागातील दुष्काळाची तिव्रता कमी होईल, असे सातवड गावचे उपसरपंच राजेंद्र पाठक यांनी सांगितले.