सीना धरणाचा पाणीसाठा पोहोचला ७७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:51+5:302021-09-12T04:25:51+5:30

कर्जत : मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहर, उपनगरात, सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा ...

The water storage of Sina Dam has reached 77 percent | सीना धरणाचा पाणीसाठा पोहोचला ७७ टक्क्यांवर

सीना धरणाचा पाणीसाठा पोहोचला ७७ टक्क्यांवर

कर्जत : मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहर, उपनगरात, सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण ७७ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती धरण शाखाधिकारी प्रवीण भांगरे यांनी दिली.

यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाळा सुरू झाला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांत पाण्याची आवक वाढली होती. मात्र, सीना धरणात मागील तीन महिन्यांत अल्प प्रमाणातच पाणी आवक झाली होती. ऑगस्टच्या अखेरीस व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सीनाचे पाणलोट क्षेत्र असलेला नगर तालुक्यातील जेऊर, शेंडी, पिंपळगाव माळवी, नगर शहर, उपनगर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सीना धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. धरणाचा पाणीसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला. सध्याही धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

धरणाची पाणी साठवण क्षमता २४०० द.ल.घ. फूट असून मृत साठा ५५२ द.ल.घ. फूट आहे. सध्या धरणातील पाणीसाठा १५६१.७३ द.ल.घ. फूट (७७ टक्के) आहे. पाणीपातळी ५८१.६० द.ल.घ. फूट आहे. मागील वर्षी धरणात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पावसाच्या पाण्यामुळे नदीही वाहती झाली आहे. सध्या धरणात एक हजार क्युसेकने पाणी आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी काही दिवस असाच पाऊस राहिल्यास लवकरच धरण ओव्हरफ्लो होईल. सततच्या पावसामुळे या भागातील तूर, कपाशी, कांदा, आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र परिसरातील बोअरवेल, विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी वाढले आहे. यंदा नुकत्याच झालेल्या पावसामुळे सीना धरणातील एकूण पाणीसाठा आजमितीला ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

----

नदी दुथडी

कडा, आष्टी भागांत नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पायथ्याशी कडी नदीतून सीना नदीत पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे नागलवाडी, नागापूर या भागांतून सीना नदी दुथडी भरून वाहत आहे.

-----

११ सीना

सीना धरणातील पाणीसाठा.

Web Title: The water storage of Sina Dam has reached 77 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.