जलस्त्रोत आटले
By Admin | Updated: August 1, 2014 00:22 IST2014-07-31T23:26:50+5:302014-08-01T00:22:16+5:30
शेवगाव : पावसाळ्याचा तब्बल पावणेदोन महिन्याचा मोठा कालावधी उलटूनही तालुक्यात अजुनही पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. त्यामुळे पाण्याचे सर्व स्त्रोत आटले असून पाणी टंचाईच्या झळा वाढत आहेत.
जलस्त्रोत आटले
शेवगाव : पावसाळ्याचा तब्बल पावणेदोन महिन्याचा मोठा कालावधी उलटूनही तालुक्यात अजुनही पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. त्यामुळे पाण्याचे सर्व स्त्रोत आटले असून पाणी टंचाईच्या झळा वाढत आहेत.
शेवगाव तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सहाशे मि.मी. आहे. यंदा जुलै महिना संपला तरी पावसाला सुरुवात नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात आतापर्यंत १२० मि. मी. पावसाची नोंद झालेली असलीतरी हा पाऊस सलग झालेला नाही. अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. भीज पध्दतीचा केवळ सलाईन पाऊस चालू आहे.
पावसाला जोर नसल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत. चापडगाव, सोनेसांगवी, ढोरजळगाव, निंबेनांदूर, वडुले, वाघोली, आव्हाणे, सामनगाव, बोधेगाव, बालमटाकळी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक भागात तर अजुनही उन्हाळा मोडलेला नाही.
तालुक्यातील २५ गावे व ९४ वाड्या,वस्त्यांना सध्या २५ टँकर ७१५ खेपांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. आव्हाणे बुद्रुक, प्रभूवाडगाव, खामपिंपरी जुनी, शेकटे खुर्द, गोळेगाव, सुकळी या तहानलेल्या गावांना तसेच नजीकच्या वाड्या-वस्त्यांसाठी टँकरची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
दुष्काळाच्या मागणीसाठी रास्ता रोको
शेवगाव : शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच इतर प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीच्यावतीने गुरुवारी येथील क्रांती चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जनावरांना दावणीला त्वरीत चारा द्यावा, मागेल त्या वाडी व वस्तीवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, पाण्याच्या टँकरमध्ये नियमितता ठेवावी, २०१२-१३ या वर्षातील हरभरा विमा शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावा, सन २०१२-१३ च्या हेक्टरी अनुदानातून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ंआंदोलनस्थळी आयोजित सभेत भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, अॅड.शिवाजीराव काकडे, अरुण मुंढे, कचरू चोथे यांची भाषणे झाली. शेवगाव ताल्रुक्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यंदाही दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही मोठा पाऊस नसल्याने मोठी टंचाईस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याबरोबर चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. आंदोलनात भाजपाचे अनिल म्हस्के, गणेश कराड, सुरेश चौधरी, मंगेश पाखरे, दिगंबर काथवटे, गंगा खेडकर, शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवगावचे तहसीलदार हरिष सोनार यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे शेवगावमधील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक विस्कळीतमुळे प्रवासी, नागरिकांचे मोठे हाल झाले.
पाणी योजना अडचणीत
शेवगाव तालुक्यात पाणी पातळी तब्बल साडेचार मीटरने खाली गेल्याने पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवत आहे. तालुक्याची जीवनरेखा असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डीसह ५४ गावे, शहरटाकळीसह २७ गावे, बोधेगावसह आठ तसेच हातगावसह २५ गावांच्या प्रादेशिक नळयोजना पुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आहे. जायकवाडी जलाशयात नव्याने पाणी न आल्यास आॅगस्टच्या महिनाअखेरीस तालुक्यातील चारही प्रमुख प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
हातपंपांचे प्रस्ताव
तालुक्यातील २५ गावे व ९४ वाड्या, वस्त्यांना २५ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु आहे. टंचाई निधीतून हाती घेण्यात आलेल्या १९ हातपंपाच्या प्रस्तावांपैकी सर्वेक्षणात सतरा हातपंपांचे प्रस्ताव अयोग्य तर पवारवस्ती, दहिगाव-ने, हनुमानवस्ती, सालवडगाव असे केवळ दोन प्रस्ताव योग्य ठरल्याने केवळ दोन हातपंपांचे काम प्रगतीपथावर आहे.
तालुक्यातील पाऊस
शेवगाव तालुक्यात आजअखेर झालेला पाऊस -(आकडे मि.मी. मध्ये) शेवगाव १२०, भातकुडगाव- १०५, बोधेगाव - ८९, चापडगाव- ५१, एरंडगाव- १७, ढोरजळगाव- ४४.