शेतीसाठी धरणातून पाणी सोडले

By Admin | Updated: August 24, 2014 01:55 IST2014-08-24T01:55:38+5:302014-08-24T01:55:54+5:30

राहुरी/अकोले/राजूर : लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरीप पिकांच्या जीवदानासाठी अखेर मुळा व निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले.

Water released from the dam for irrigation | शेतीसाठी धरणातून पाणी सोडले

शेतीसाठी धरणातून पाणी सोडले

राहुरी/अकोले/राजूर : लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरीप पिकांच्या जीवदानासाठी अखेर मुळा व निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले. २२ ते २५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून, यादरम्यान दोन्ही धरणांतून सुमारे ९ टीएमसी पाणीवापर होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
मुळा पाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून डाव्या क ालव्यातून शुक्रवारी सकाळी ६ वाजता १५०,सकाळी ९ वाजता २००, दुपारी १२ वाजता २५०, तर दुपारी ३ वाजता ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़ डाव्या कालव्याखाली ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळणार आहे़ त्याचबरोबर धरणाच्या उजव्या कालव्यातुनही शनिवारी सायंकाळी ७५० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले़ त्यात नंतर वाढ करण्यात येणार असून या कालव्याखाली २६००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. साधारण ३८ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे़ लाभक्षेत्रावर पावसाने हजेरी लावली तर आवर्तनाचा कालावधी कमी होऊ शकतो़
२६००० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात सध्या १९ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.
लाभक्षेत्रात पाऊस झाला नाही तर
दोन्ही कालव्यांतून सुमारे ६ टीएमसी पाण्याचा वापर होऊ शकतो. (प्रतिनिधी)
अकोले: निळवंडे धरणातूनही शनिवारी सायंकाळी सहा वाजता शेतीसाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात आले.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी दीड महिन्याच्या उशिराने पावसाचे आगमन होऊनही पंधरा आॅगस्टपूर्वी धरण भरले. याबरोबरच निळवंडे धरणही ९० टक्क्यांहून अधिक भरले मात्र लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. लाभक्षेत्रातील पिकांसाठी भंडारदरा-निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी वाढत असतानाच पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दोन दिवसांपूर्वी पाणी सुटणार असल्याचे सांगितले होते.
शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वीजनिर्मितीसाठी ८१६ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. याबरोबरच निळवंडे धरणाच्या पाणलोटातही मुसळधार पावसाच्या सरी बरसल्यामुळे सकाळी निळवंडे धरणातील पाणी साठ्याने सहा टीएमसीचा टप्पा पार केला होता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून १ हजार ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या आवर्तनात ३ टीएमसी पाणी वापरले जाण्याची शक्यता असून, हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदाचे सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. निळवंडे धरणातून पाणी सोडतेवेळी धरणात ६ हजार १०४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Water released from the dam for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.