गोदावरी कालव्यांना पाणी
By Admin | Updated: August 1, 2014 00:22 IST2014-07-31T23:30:52+5:302014-08-01T00:22:42+5:30
कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण ७० टक्के भरले आहे़
गोदावरी कालव्यांना पाणी
कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण ७० टक्के भरले आहे़ या धरणातून गुरूवारी दुपारी तीन वाजता १८ हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत होता़ नांदुर मध्यमेश्वरच्या सांडव्यावरून २१ हजार ५०० क्युसेक पाणी गोदापात्रात कोसळत होते़ त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही गोदावरी नदी प्रवाही राहिली़
दारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम आहे़ बुधवारी रात्री नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे कोपरगाव येथे दुपारपर्यंत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती़ गुरूवारी दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला़ दुपारी तीन वाजता १८ हजार ४०० क्युसेकने पाणी दारणेतून सोडण्यात आले़ पुढे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून २१ हजार ५०० क्युसेकने पाणी नदीपात्रात कोसळत होते़
नांदूर मध्यमेश्वर येथून गोदावरी डाव्या कालव्यात २५० क्युसेकने, तर उजव्या कालव्यात ५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले़ कालव्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन आहे़ पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटल्याने कोपरगाव, राहाता तालुक्यातील जवळपास ६० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे़
गुरूवारी सकाळी सहा वाजता गेल्या चोविस तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे़ (कंसातील आकडे एकुण पावसाचे) कोपरगाव- १० (९७), मध्यमेश्वर- ४२ (२१५), शेवगाव- ३५ (१०१), महालखेडा-३५ (११५), ब्राह्मणगाव- २७ (१३२), पढेगाव- ९ (११६) मी़मि़ पाऊस झाल्याचे पाट बंधारे विभागाचे महाले यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)