श्रीरामपुरात पाणी कपात
By Admin | Updated: June 28, 2014 01:11 IST2014-06-27T23:29:44+5:302014-06-28T01:11:44+5:30
श्रीरामपूर: जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून श्रीरामपूर तालुक्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे.

श्रीरामपुरात पाणी कपात
श्रीरामपूर: जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून श्रीरामपूर तालुक्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे.
निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले होते. पण जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तसेच कालवा सल्लागार समितीच्या नियंत्रणाअभावी हे पाणी वरच्याच भागात गायब झाले. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी केली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेचे दोन साठवण तलाव आहेत. प्रवरा डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे पाणी कालव्याच्या अकराशे क्युसेस या पूर्ण क्षमतेने नॉर्दन ब्रँचपर्यंत आल्यास ३ दिवसात म्हणजे ७२ तासात श्रीरामपूरचे साठवण तलाव भरतात. त्यातून ४५ दिवस पुरेल एवढा पाणी साठा होतो. पण यावेळी जेमतेम २५ तासच पाणी मिळाले. तेही ८० क्युसेसने मिळाले. पूर्वीचा ४ दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेस फक्त १२ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा आहे. आणखी ४६ तास पाणी मिळाले असते तर ५ आॅगस्टपर्यंत पुरेल, एवढा पाणी साठा साठवण तलावात झाला असता, असे श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)