अहमदनगर : नाशिक शहरात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी व मुळा नदीच्या पाणीपातळीत रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वाढ झाली़ त्यामुळे गोदावरी काठच्या राहाता, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर व मुळा नदीवरील मांडवा पूल परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़ पारनेर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासकीय यंत्रणेला दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत़मुळा व भंडारदरा पाणलोटक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे़ रविवारी नाशिक शहरातील पावसाचा जोर वाढला़ त्यामुळे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदुरमधमेश्वर बंधारा भरून गोदावरी नदी वाहती झाली़ पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी काठी असलेल्या राहाता, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे़ मुळा नदीवरील संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणारा मांडवे येथील पूल दुपारनंतर पाण्याखाली गेला़ पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला़ त्यामुळे या भागातील गावांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले़ दरम्यान, अकोले तालुक्यातील फोफसंडी व पाचनयी परिसरात दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला़ रस्त्यावरील मातीचे ढीग हटविण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली़ याशिवाय भीमा नदीत ५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाला आहे़ धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे़ दिवसभरात भंडारदरा धरण पाणलोटात १३१ मि़ मी़ पावसाची नोंद झाली असून, भंडारदरा धरणात ४ हजार २५५ तर मुळा धरणात ७ हजार ६९३ दलघफू पाणीसाठा होता़ मुळा धरणात ५२ हजार १०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे़ (प्रतिनिधी)
‘गोदावरी’, ‘मुळा’ काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By admin | Updated: July 11, 2016 01:01 IST