वाडेगव्हाण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:10+5:302021-07-28T04:22:10+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील नगर-पुणे रोडवरील वाडेगव्हाण गावाला कोरोनाच्या विळख्यातून सोडविण्यात ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाला यश मिळाले आहे. सध्या ...

वाडेगव्हाण झाले कोरोनामुक्त
सुपा : पारनेर तालुक्यातील नगर-पुणे रोडवरील वाडेगव्हाण गावाला कोरोनाच्या विळख्यातून सोडविण्यात ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाला यश मिळाले आहे. सध्या गावात एकही कोरोना रुग्ण नाही. कोरोना मुक्तीसाठी ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येकाची तपासणी केली. तसेच गावात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचीही तपासणी माेहीम राबविली आहे.
लग्न सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी खबरदारी घेत नाहीत. लग्नात बिनधास्तपणे वावरतात. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग असे नियम न पाळता वऱ्हाडी मंडळी एकत्र बसून गप्पात रंगून जातात. त्यामुळे झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन त्याचा प्रसार होतो. त्यामुळे गावात लग्न मंडपातच आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण करून वधू, वर व वऱ्हाडी मंडळींची तपासणी करून घेतली. तेथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, असे सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी सांगितले.
गाव व परिसरात कोरोनाच्या रुग्ण तपासणीसाठी सात कॅम्प घेतले गेले. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांपैकी एकूण ७७१ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी जी. एस. धाडवे यांनी दिली. आरोग्य विभागातील आरोग्यसेविका अर्चना काशीद व आरोग्य सेवक गुंजकर यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने ठिकठिकाणी तपासणी शिबिर घेऊन संशयित रुग्णांना तपासणी व उपचारांची सोय करून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा हेतू होता, असे उपसरपंच रवींद्र शेळके यांनी सांगितले.
.............
शाळा होणार सुरू
वाडेगव्हाणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने येथील विद्या धाम या प्रशालेतील आठवी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षण विभागाने ऑफलाईन शिक्षणासाठी वर्ग भरविण्यासाठी परवानगी मिळाली असून, १५ जुलैपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक आनंदीत असल्याचे सरपंच सोनवणे यांनी सांगितले.
.................
फोटो : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे लग्नसोहळ्यात थेट मंडपात नवविवाहित दाम्पत्याच्या तपासणीपासून मोहिमेस सुरुवात करताना आरोग्य कर्मचारी.