साईआधारकडून शासकीय आदेशांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:42+5:302021-07-31T04:22:42+5:30
श्रीरामपूर : येथील साईआधार कोविड रुग्णालयाने कोविड रुग्णाकडून ऑक्सिजन बेडकरिता दिवसाला ७५०० रुपये आकारणी केली आहे. याशिवाय सामान्य श्रेणीच्या ...

साईआधारकडून शासकीय आदेशांचे उल्लंघन
श्रीरामपूर : येथील साईआधार कोविड रुग्णालयाने कोविड रुग्णाकडून ऑक्सिजन बेडकरिता दिवसाला ७५०० रुपये आकारणी केली आहे. याशिवाय सामान्य श्रेणीच्या वॉर्डाकरिता स्वतंत्रपणे ४ हजार रुपये अकारण्यात आले. याप्रकरणी आता प्रांताधिकारी यांनी चौकशी सुरू केली असून ऑडिटरचे म्हणणे मागविले आहे. शहरातील मोरगेवस्ती भागातील सुषमा प्रतापसिंग चंदेले यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर या प्रकाराला वाचा फुटली. जिल्हाधिकारी यांनी बिलांची तपासणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत `लोकमत`ने चंदेले यांच्या बिलांची पडताळणी केली असता ऑक्सिजनच्या बिल आकारणीची बाब समोर आली. चंदेले यांच्याकडून दिवसाला ७५०० हजार रुपये याप्रमाणे दहा दिवसांच्या उपचाराचे ७५ हजार रुपये आकारण्यात आले. याशिवाय सामान्य वॉर्डाचे ४ हजार रुपये याप्रमाणे सहा दिवसांचे स्वतंत्रपणे २४ हजार रुपये घेण्यात आले.
राज्य सरकारच्या ३० ऑगस्ट २०२० च्या आदेशाचे हे उल्लंघन आहे. सामान्य अथवा आयसीयू वाॅर्डमधील उपचारात ऑक्सिजन सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे त्याकरिता पैसे आकारता येत नाही, असे आदेश सांगतो. मात्र साईआधार रुग्णालयाने आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.
उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनीही लोकमतशी बोलताना साईआधार रुग्णालयाने चंदेले यांच्याकडून नियमबाह्य पद्धतीने ऑक्सिजनचा खर्च अकारल्याचे म्हटले होते.
--------
आदेश काय सांगतो
सरकारी आदेशानुसार सामान्य वॉर्डकरिता दिवसाला ४ हजार, आयसीयू सुविधेला ७५०० तर आयसीयू व व्हेंटिलेटरसाठी ९ हजार रुपये आकारणी निर्धारित केलेली आहे. यामध्ये दैनंदिन तपासणी, टूडी इको, एक्सरे, ईसीजी, औषधे, ऑक्सिजन आणि बेड यांचा समावेश आहे.
----------
साईआधार रुग्णालयाविरोधातील तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणीचे आदेश प्राप्त झाले आहेत. रुग्णालयाचे ऑडिटर तसेच गटविकास अधिकारी यांना सोमवारी माहिती घेऊन पाचारण करण्यात आले आहे.
-अनिल पवार, प्रांताधिकारी, श्रीरामपूर.
-------