पाथर्डी तालुक्यातील गावांना मिळेनात ग्रामसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:33+5:302021-08-15T04:23:33+5:30
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील आगसखांड, हातराळ, वाळूंज, चितळी, जोडमोहोज, शिरसाठवाडी, दैत्यनांदूर या गावातील कारभार ग्रामसेविकांविना सुरू आहे. पंचायत समिती ...

पाथर्डी तालुक्यातील गावांना मिळेनात ग्रामसेवक
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील आगसखांड, हातराळ, वाळूंज, चितळी, जोडमोहोज, शिरसाठवाडी, दैत्यनांदूर या गावातील कारभार ग्रामसेविकांविना सुरू आहे. पंचायत समिती अधिकारी, ग्रामपंचायत, सरपंच, सभापती यांच्यातील मतभेदांमुळे ग्रामसेवकांच्या नियुक्त्या रखडल्याची चर्चा आहे.
कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये येणाऱ्या या गावातील ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. नव्याने येणाऱ्या नियुक्ती देण्यात आलेल्या ग्रामसेवकांना येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा विरोध आहे. पंचायत समितीकडून ग्रामसेवक बदलून मिळण्यासाठीचे लेखी आश्वासन दिलेले आहे. मात्र तरीही ते मिळत नाहीत. वास्तविक सरपंच हा त्या गावातील प्रमुख असून ग्रामसेवक हा सचिव म्हणून काम पाहतो. त्यांचे काम सुरळीत चालण्यासाठी या दोघांमध्ये समन्वय गरजेचा आहे. एखाद्या गावातील ग्रामसेवक पंचायत समितीकडून बदलून मागितला तर तो मिळाला पाहिजे, असे मत सरपंच यांचे आहे.
असे होत नसल्याने पंचायत समितीतील अधिकारी मनमानी कारभार करत असून सरपंचांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचे काम केले जात असल्याचे सरपंच व पदाधिकारी यांच्याकडून बोलले जात आहे. त्यामुळे या गावातील जुन्या ग्रामसेवकांची प्रशासकीय बदली होऊनही त्यांना नवीन गावांचे चार्ज घेता येत नाहीत. त्यापुढील ग्रामसेवकांना पुढील गावे अशा पद्धतीने एकूण सर्व बदल्यांचा प्रकार पहावयास मिळत आहे.
-----
काही गावांमधून ग्रामसेवक नको असल्याबाबत तक्रारी येत आहेत. सरपंच लोकप्रतिनिधी असून ग्रामविस्तार अधिकारी यांनी याबाबत समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही.
-सुनीता दौंड,
सभापती, पंचायत समिती, पाथर्डी