थर्ड डिग्रीच्या दहशतीखाली गाव
By Admin | Updated: October 29, 2014 23:57 IST2014-10-29T23:56:31+5:302014-10-29T23:57:23+5:30
पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलीत कुटुंबातील तीघांच्या हत्या प्रकरणात पोलीस विनाकारण गावातील व्यक्तींना रात्री अपरात्री उचलतात व थर्ड डिग्री लावून अमानुषपणे मारहाण करतात

थर्ड डिग्रीच्या दहशतीखाली गाव
पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलीत कुटुंबातील तीघांच्या हत्या प्रकरणात पोलीस विनाकारण गावातील व्यक्तींना रात्री अपरात्री उचलतात व थर्ड डिग्री लावून अमानुषपणे मारहाण करतात या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत याचा त्रास महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडली़ ग्रामस्थांची चौकशी गावातच करावी, अशी मागणी केली़
जवखेडे खालसा येथे मागील आठवड्यात जाधव या कुटुंबातील तीघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली़ याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. दलीत चळवळीतील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडे खालसा येथे भेट देवून आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी करीत पोलिसांवर दबाव आणला़ त्यामुळे पोलिसांनी गावातील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली़ पोलिसांनी गावातील सुमारे ५० संशयितांना ताब्यात घेतले़ पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या तक्रारीनंतर ग्रामस्थांनी बुधवारी (दि़२९) महादेव मंदिरात बैठक घेतली़ यावेळी ज्येष्ठ नेते उध्ववराव वाघ, अॅड.वैभव आंधळे, चारूदत्त वाघ, अमोल वाघ, सुरेश वाघ आदींसह सुमारे दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते़ यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
बैठकीत ग्रामस्थांनी सांगितले की, पोलीस रात्री-अपरात्री येऊन ताब्यात घेतात, मारहाण करतात, थर्ड डिग्री लावण्याचा दम देतात़ त्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे़ या घटनेचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी आमची इच्छा आहे व मागणीही आहे. परंतु गावकऱ्यांना पोलीस अमानुषपणे मारहान करीत आहेत़ त्याबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला़ महिलांनीही तीव्र शब्दात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शशीराज पाटोळे, पो.नि.सुभाष अनमुलवार आदी उपस्थित होते.
यापुढे ग्रामस्थांची चौकशी गावातच होईल, तसेच आमच्या परवानगीशिवाय कोणालाही ताब्यात घेतले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी ग्रामस्थांना दिले. (तालुका प्रतिनिधी)