VIDEO : 'एमआयआरसी'मध्ये 272 जवानांनी घेतली शपथ; देश सेवेसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 11:02 IST2019-01-12T10:49:35+5:302019-01-12T11:02:31+5:30
भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून 272 सैनिकांनी शानदार समारंभात देशसेवेची शपथ घेतली.

VIDEO : 'एमआयआरसी'मध्ये 272 जवानांनी घेतली शपथ; देश सेवेसाठी सज्ज
अहमदनगर : भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून 272 सैनिकांनी शानदार दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ घेतली. मेजर जनरल नवनीत कुमार यांनी या शानदार परेडचे निरीक्षण केले.यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व शपथग्रहण करणा-या सैनिकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगरमध्ये असलेल्या एमआयआरसीमधील अखौरा ड्रील मैदानावर हा दीक्षांत समारंभ पार पडला.
एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही.व्ही. सुब्रमण्यम, कर्नल विनयकुमार यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व रिक्रुट जवानांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्करी प्रथेनुसार विविध धर्म गुरूंनी आपापल्या पवित्र धर्मग्रंथांवर हात ठेवून संविधान व देश संरक्षणासाठी इमानदारी, निष्ठा व कठीण स्थितीत आपली जबाबदारी पूर्ण करण्याची शपथ दिली.
मेजर जनरल नवनीत कुमार यांनी तुकडीतील सर्वोत्कृष्ट रिक्रुट साठीचे जनरल सुंदरजी सुवर्ण पदक रिक्रुट गोपाल सिंह याला,जनरल डिसुजा रजत पदक रिक्रुट अखिल कृष्णन याला व रिक्रुट प्रतिक याला जनरल पंकज जोशी कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले.
दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केल्यानंतर मेजर जनरल नवनीत कुमार यांनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवा सैनिकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, कठीण परिश्रम व कठोर मेहनतीच्या आधारे प्रशिक्षण सफलतापूर्वक पूर्ण करणारे हे कुशल सैनिक आता ख-या अर्थाने आपल्या सैनिक जीवनाची सुरूवात करीत आहेत. प्रशिक्षणादरम्यान त्यांना अनेक आव्हाने व कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे युवा फौजी देशाची आन, बान आणि शान यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही तयार आहेत.
दीक्षांत परेड नंतर आयोजित शानदार समारंभात प्रशिक्षण पूर्ण करून सेनेत दाखल होणार्या या युवा सैनिकांच्या माता-पित्यांना विशेष गौरव पदक प्रदान करून गौैरविण्यात आले. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शपथग्रहण करणा-या या सर्व तरुण सैनिकांना आपल्या युनिटमध्ये जाण्यापूर्वी अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.