नगरमध्ये पावसाने घेतला दोघांचा बळी
By Admin | Updated: June 4, 2014 00:15 IST2014-06-04T00:04:53+5:302014-06-04T00:15:17+5:30
अहमदनगर/राहुरी : अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नगर शहर, परिसरासह राहुरी तालुक्यात वांबोरी, सडे, उंबरे, ब्राम्हणी येथे शेकडो घरांची पडझड झाली़

नगरमध्ये पावसाने घेतला दोघांचा बळी
अहमदनगर/राहुरी : अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नगर शहर, परिसरासह राहुरी तालुक्यात वांबोरी, सडे, उंबरे, ब्राम्हणी येथे शेकडो घरांची पडझड झाली़ शेकडो झाडे वादळामुळे पडली़ वांबोरी येथे राजेश खाकळ (वय-१२) हा मुलगा पत्रा लागून मयत झाला़ तर नगर तालुक्यातील खंडाळा येथे अण्णा बाळू दातीर (वय ५५) खडी क्रेशरची भिंत अंगावर पडून मयत झाला. सडे व ब्राम्हणी येथे चार जण जखमी झाले़ वांबोरी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेचे दहा खोल्यांचे पत्रे दूर अंतरावर जाऊन पडले़ नूतन सहकारी सोसायटी व महेश मुनोत विद्यालयाचे पत्रे उडून गेले़ प्रसाद शुगर वसाहतीचे पत्रे एक किलोमीटर अंतरावर उडून गेले़ पोपट पटारे यांच्या घराचे पत्रे उडून गेले़ वादळी पावसामुळे बहुतांश घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेक लोक बेघर झाले़ खळवाडी येथे आजम शेख, अक्रम शेख, सुभाष येवले यांच्यासह शेकडो घरांचे पत्रे उडाले. तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब आणि झाडे पडली. सडे येथे शिवाजी माळी यांच्या घरावर सुभाष माळी व मच्छिंद्र माळी यांच्या घराचे पत्रे उडाली़ या अपघातात शिवाजी माळी यांच्यासह तिघे जखमी झाले़ वादळात सडे परिसरात असलेल्या महादेववाडी परिसरात तीस घरांची पडझड झाली़ भीमराज दिवे, सुनील धोंडे, अरुण फाटक, एकनाथ आव्हाड, शीला खरात, माकर्स साळवे, उत्तम पवार, बबन दिवे यांच्या घराचे पत्रे उडून गेले़ नगर शहराला आणि भिंगारला पावसाने झोडपले. भिंगारला वादळी वार्यांमुळे पोलीस वसाहतीचे पत्रे उडाले. सायंकाळी उशीरा वादळी वार्यासह, वीजेच्या कडकडाटाने पावसाला सुरूवात झाली. यावेळी अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडे उन्मळून पडली. पोलीस वसाहतीतील पाच पोलीस कर्मचार्यांचे संसार उघड्यावर पडले. नगर शहरालाही जोरदार पावसाने झोडपून काढले. शहरात सखल भागात पाणी साचले होते. (प्रतिनिधी)
नाशकात दोघांचा, रत्नागिरीत एकाचा मृत्यू
मुंबई : राज्यात मंगळवारी काही ठिकाणी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये दोघांचा आणि रत्नागिरीत वीज पडून एकाचा मृत्यू झाला़ रत्नागिरीत सर्वाधिक १७ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यभर ढगाळ हवामान असले तरी विदर्भात सूर्य आग ओकत होता. तेथील बहुतांशी शहरांचे तापमान ४३ अंशाच्या वर होते. राज्यात सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान ब्रम्हपूरीत होते. राज्यभर पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. त्यानुसार मध्य महाराष्टÑ, कोकण आणि मराठवाडयात पावसाने हजेरी लावली. सातारा, औरंगाबादमध्ये, पुण्याच्या लोहगाव भागात पडल्याची नोंद झाली. नाशिक तालुक्यातील नाणेगाव येथे समाधान दाते (२८) व पळसे येथे रूपाली आगळे (१८) या तरुणीचा वीज पडून मृत्यू झाला़ रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा धडाका सुरू केला असून सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत पाऊस बरसत होता. रत्नागिरीनजीक गोळप येथे चालत्या दुचाकीवर वीज कोसळून अनंत सीताराम बोल्ये (३९) हा ठार झाला. सर्वाधिक पाऊस लांजा आणि चिपळुणात झाल्याची नोंद आहे.