वडिलांच्या हत्येचे दु:ख बाजुला सारून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने दिली बारावीची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 22:50 IST2025-02-11T22:47:21+5:302025-02-11T22:50:50+5:30

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार, जामखेड तालुक्यातील पाडळीत परीक्षा केंद्र...

Vaibhavi gave her 12th exam, putting aside the grief of her father's murder | वडिलांच्या हत्येचे दु:ख बाजुला सारून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने दिली बारावीची परीक्षा

वडिलांच्या हत्येचे दु:ख बाजुला सारून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने दिली बारावीची परीक्षा

जामखेड (जि. अहिल्यानगर) : बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर चांगला गेला आहे. वडिलांच्या अपेक्षा, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे, असे सांगत मस्साजोग (जि. बीड) येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली.

मस्साजोग (जि. बीड) येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख मंगळवारी जामखेड तालुक्यातील पाडळी येथील संभाजीराजे जुनिअर कॉलेज बारावीच्या परीक्षेचा पहिला इंग्रजीचा पेपर दिला. त्यानंतर तिच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी वैभवी म्हणाली, आजचा इंग्रजीच्या पेपरला जेवढे लिहायचे होते ते लिहिले आहे. दोन महिने होऊन गेले, वडिलांची प्रत्येक क्षणाला आठवण येते. घरात पाय टाकला की ते घरात कुठेच दिसत नाहीत; पण ते जरी शरीराने नसले तरी त्यांच्या भावना व विचार कायम आमच्या सोबत आहेत. माझे वडील घरात होते किंवा सोबत होते त्यावेळी आमचा आनंद खूप मोठा होता. त्यांच्या जाण्याने आमचा आनंद हिरावला आहे. खूप मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबावर व गावावर कोसळला आहे. वडिलांचे माझ्याकडून जे स्वप्न होते ते मी पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांना संपवणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

वैभवीला मिळाली खंबीर साथ
वैभवी देशमुख हिच्या वडिलांची दोन महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यामुळे देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, या कठीण प्रसंगात खचून न जाता वैभवीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि अभ्यास सुरूच ठेवला. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आणि कुटुंबावर आली. मात्र, त्यांनी वैभवीला खंबीरपणे साथ दिली. वैभवीच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक जामखेडमध्ये सर्वत्र होत आहे. गावातील नागरिक, नातेवाईक आणि शिक्षक तिच्या पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा देत आहेत. तिच्या मेहनतीला लवकरच यश मिळेल, अशी सर्वांनीच सदिच्छा व्यक्त केली.

Web Title: Vaibhavi gave her 12th exam, putting aside the grief of her father's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.