ज्येष्ठांना डावलून युवकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:59+5:302021-05-15T04:19:59+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या सावेडी उपनगरातील लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी १८ ते ४४ वयोगटातील ७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ...

Vaccination of youth by beating the seniors | ज्येष्ठांना डावलून युवकांचे लसीकरण

ज्येष्ठांना डावलून युवकांचे लसीकरण

अहमदनगर : महापालिकेच्या सावेडी उपनगरातील लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी १८ ते ४४ वयोगटातील ७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजकीय दबावाखाली हे लसीकरण केल्याचे बोलले जात असून, मनपाच्या आरोग्य यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडून ४५ ते ६० वयोगटातील ज्येष्ठांना कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जात आहे. शहर व परिसरातील मनपाच्या सात आरोग्य केंद्रांवर ही लस दिली जाते. प्रत्येक आराेग्य केंद्राला दररोज शंभर डोस वितरित होतात. हे डोस फक्त ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना द्यावेत, असा आयुक्तांचा स्पष्ट आदेश आहे. या वयोगटातील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन सहा आठवडे झाले आहेत त्यांची नोंदणी होते. त्यानंतर संबंधितांची यादी तयार करून त्यांना डोस दिला जात आहे. असे असताना काही आरोग्य केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना डावलून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लस देण्याचे प्रकार सुरू आहेत. सावेडी केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील चक्क ७० नागरिकांना लस दिली गेली. म्हणजे यादीतील ज्येष्ठ नागिरकांना डावलून ही लस दिली गेली. वास्तविक पाहता १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांना लस देणेच मुळात नियमबाह्य आहे. कारण या वयोगटातील नागरिकांची पोर्टलवर नोंदणच होत नाही. मग असे असतनादेखील या वयोगटातील नागरिकांना लस कशी दिली गेली, ही लस कुणाच्या आशीर्वादाने दिली गेली. केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर कुणी दबाव आणला, यासह अनेक प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

.....

दररोज नवीन एक लसीकरण केंद्र

महापालिकेचे अधिकृत सात लसीकरण केंद्रे आहेत. या लसीकरण केंद्रावर यादीनुसार लस दिली जात असल्याने गर्दी हाेत नाही. मात्र, एकाच केंद्रावर गर्दी होत असल्याने नगरसेवकांकडून दररोज एका नवीन लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन केले जात आहे. मुळात हे लसीकरण केंद्रच बेकायदेशीर आहे. अशा लसीकरण केंद्रावर लस दिल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे. याशिवाय केंद्र वाढल्याने लसींची संख्या वाढत नाही. अर्धी लस एका केंद्रावर, तर अर्धी दुसऱ्या केंद्रावर, अशी विभागणी केली जात असल्याने लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे.

...

याबाबत कोणतीही माहिती नाही. शुक्रवारी दिवसभरात किती नागरिकांना लस दिली गेली याचा अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतरच याबाबत बोलणे योग्य होईल.

- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका

................

- शुक्रवारी झालेल्या लसीकरणाचा अहवाल अजून आलेला नाही. याबाबत चौकशी केली जाईल, तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांच्या याद्या तयार करून त्यानुसार लसीकरण करण्याचा आदेश सर्व आरोग्य केंद्र प्रमुखांना देण्यात आला आहे.

-डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.

Web Title: Vaccination of youth by beating the seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.