कोपरगावात टोकन पद्धतीने लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST2021-05-01T04:20:11+5:302021-05-01T04:20:11+5:30
कोपरगाव : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत होता. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या शेकडो ...

कोपरगावात टोकन पद्धतीने लसीकरण
कोपरगाव : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत होता. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या शेकडो ज्येष्ठ नागिरकांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने त्यांची हेळसांड होत होती. या समस्येविषयी ‘लोकमत’ने शुक्रवारी (दि. ३०) वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली होती. त्याची प्रशासनाने दखल घेत लसीकरणासाठी आता टोकन पद्धत सुरू केली आहे.
त्यानुसार शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना उपलब्ध असलेल्या १३० डोसनुसार टोकन देण्यात आले. त्यानुसार फक्त तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी थांबणे अनिवार्य झाले. यापूर्वी नेमकी लस किती उपलब्ध आहे, आपला नंबर कधी येणार, यात बरेच नागरिक उशिरापर्यंत रांगेत ताटकळत उभे राहत होते. त्यामुळे त्यांची खूप गैरसोय होत होती; परंतु टोकन पद्धतीनुसार आता उर्वरित नागरिकांना आपल्याला लस मिळणार की नाही हे लगेच समजणार आहे. त्यामुळे वाट पाहत थांबण्याची गरज नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड टळणार आहे. तसेच याच नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारी चीडचीड देखील टळणार आहे.
.........
या आठवड्यात लसीचा पुरवठा वाढविणे गरजेचे ..
या आठवड्यात ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेऊन ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी लस जास्त प्रमाणात लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. लसीचा असाच कमी प्रमाणात पुरवठा सुरू राहिल्यास जास्त दिवस होऊन या सर्व धावपळीत पहिला डोस वाया तर जाणार नाही ना ? याची देखील चिंता सध्या नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे निदान या आठवड्यात तरी जास्त प्रमाणात लसीचा पुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे.