अकरा दिवसांत साडेचार लाख डोसचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST2021-09-12T04:26:02+5:302021-09-12T04:26:02+5:30
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी लसीकरणाचा वेग कमी होता. मात्र, हळूहळू हा वेग वाढवण्यात आला. ...

अकरा दिवसांत साडेचार लाख डोसचे लसीकरण
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी लसीकरणाचा वेग कमी होता. मात्र, हळूहळू हा वेग वाढवण्यात आला. आता १८ वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण करण्यात येत आहे. १८ वर्षांपुढील ३८ लाख ८७ लाख ७६४ नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. १ सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. गेल्या ११ दिवसांत ४ लाख ६७ हजार डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे उत्तम नियोजन सुरू आहे. जेवढे लसीकरण रोज संपेल, त्यापेक्षा जास्त लस दुसऱ्या दिवशी त्या केंद्रांना मिळत आहे. म्हणजे ‘कामगिरी दाखवा व लस मिळवा’ असे हे सूत्र असून त्याप्रमाणात सध्या मुबलक लस उपलब्ध होत आहे. शनिवारी (दि. ११) आरोग्य विभागाने १ लाख डोस देण्याचे नियोजन केले होते. त्यात दिवसभरात ९० हजार डोस देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते. गेल्या आठ महिन्यांपासून आरोग्य विभाग लसीकरणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. इतर नियमित लसीकरण सांभाळून कोरोना लसीकरणाचे उत्तम नियोजन आरोग्य विभाग सांभाळत आहे. अनेक कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून साप्ताहिक सुटी न घेता सलग लसीकरणाचे काम करत आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याचा लसीकरणाचा आकडा झपाट्याने पुढे जात आहे.
--------------
ग्रामीण रुग्णालयांचे डोस शिल्लक
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तसेच महानगरपालिकांच्या केंद्रांवर दिलेले डोस संपत आहेत. मात्र तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डोस शिल्लक राहत आहेत. या ठिकाणी लसीकरणाचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीही येत असल्याचे दिसत आहे.
--------------
नगरचा कोरोना आकडा पाचवरून पुन्हा ३४
नगर शहरात शुक्रवारी केवळ ५ रुग्ण आढळल्याचे मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले होते. त्यामुळे शहरातील रुग्ण कमी होत असल्याचे दिसत असतानाच दुसऱ्याच दिवशी शनिवारी शहरात कोरोनाबाधितांचा आकडा थेट ३४ वर पोहोचला. त्यामुळे शहरात कोरोनाचा धोका आहेच. गणेशोत्सवात गर्दी करून संसर्ग वाढू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
--------------
गेल्या दहा दिवसांतील लसीकरण
१ सप्टेंबर ५६७२९
२ सप्टेंबर २९४९९
३ सप्टेंबर ९७१९
४ सप्टेंबर ६४६३१
५ सप्टेंबर ६२५४
६ सप्टेंबर ९८४६
७ सप्टेंबर ५९५०१
८ सप्टेंबर ९०५८८
९ सप्टेंबर ४३८५९
१० सप्टेंबर ६४००
११ सप्टेंबर ९०,०००
----------------------
एकूण ४,६७,०२६